Team MyPuneCity – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Pimpri Chinchwad) यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने ६ दिवसांचा भव्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (दि. १९ मे २०२५) पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक, जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा वीणा सोनवलकर, माजी नगरसेवक राजू दुर्गे, तसेच समितीचे प्रमुख सदस्य अशोक खरात, धनंजय ताणले, महावीर काळे, गणेश खरात, सचिन सरक, रेखा दूधभाते, पल्लवी मारकड, पोपट हजारे, विठ्ठल देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत समितीच्या वतीने उपायुक्त अण्णा बोदडे यांना एक निवेदन देण्यात आले असून, त्यात दिनांक २६ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत अहिल्यादेवींचा जयंती महोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन लवकरच जाहीर होणार आहे.
या महोत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे ३१ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य मिरवणूक, जी सकाळी ८ ते ११ या वेळेत खंडोबा मंदिर, आकुर्डी येथून सुरू होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, पिंपरी येथे समाप्त होणार आहे. या मिरवणुकीमध्ये शेकडो महिला, सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी, सांस्कृतिक पथकं आणि ढोल-ताशा पथकांचा सहभाग अपेक्षित आहे.
Dr. Jayant Naralikar Passed Away : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
अहिल्यादेवी होळकर यांची कार्यकारणी, समाजहिताचे योगदान आणि न्यायप्रिय राज्यकारभार याचे स्मरण करून देणारे व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रप्रदर्शन, महिला सशक्तीकरणासाठी कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन महोत्सव काळात केले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती अत्यंत गौरवपूर्ण आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.