Team My pune city – चाकण ते शिक्रापूर हायवे रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोवरील चालकाने टेम्पो भरधाव वेगात चालवून एका ( Pimpri Chichwad Crime News 21 July 2025)पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून पळून गेला. ही घटना शनिवारी (१९ जुलै) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कडाचीवाडी, चाकण ते शिक्रापूर हायवे रोडवर घडली.
सुभाष आत्मराम हुपाडे (५०, राहाटी, यवतमाळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अविनाश संभाजी मेश्राम (४०, रासे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांढऱ्या रंगाचे आयशर टेम्पो वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सुभाष असे दवाखान्यात औषधोपचार करून जेवण पार्सल घेण्यासाठी पायी जात असताना, समोरून चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जाणारा एक पांढऱ्या रंगाचा आयशर टेम्पो वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो भरधाव वेगात व हयगईने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सुभाष हुपाडे यांना धडक देऊन अपघात करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आणि अपघाताची माहिती न देता पळून गेला. चाकण पोलीस तपास करत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू ( Pimpri Chichwad Crime News 21 July 2025)
अंकुश चौक येथील मोकळ्या जागेत एका अनोळखी वाहनावरील चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका व्यक्तीला धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२० जुलै) सकाळी साडेदहा वाजता अंकुश चौक, निगडी येथे घडली.
संदीप देविदास नाटेकर (३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात बसुराज साहेबराव नाटेकर (४१, मिलींदनगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे, हयगईने, निष्काळजीपणे चालवून फिर्यादी नाटेकर यांचा चुलत भाऊ संदीप नाटेकर यांना धडक दिली. टेम्पोचे चाक अंगावरून गेल्याने संदीप नाटेकर यांचा जागीच मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
मिक्सर ट्रकच्या धडकेत तरुण गंभीर जखमी ( Pimpri Chichwad Crime News 21 July 2025)
तळवडे येथील त्रिवेणी नगर चौकात एका सिमेंट मिक्सरच्या ट्रकवरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून एका तरुणाला धडक दिली. या अपघातात तरुणाच्या डाव्या पायाचे हाड पूर्णपणे फ्रॅक्चर झाले आणि चालक वाहन न थांबवता निघून गेला. ही घटना शनिवारी (१९ जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
सोहम श्रीराम नाईक असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत सोहम याचे वडील श्रीराम वसंत नाईक (४७, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिमेंट मिक्सरचा ट्रक वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा सोहम हा गाडीवरून जात असताना त्याच्या डाव्या बाजूने जाणारा मिक्सर ट्रक वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगामध्ये गाडी चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवून सोहम यास धडक दिली. या अपघातात सोहम याच्या डाव्या पायाचे हाड नडगीमधून पूर्णपणे फ्रॅक्चर करून वाहन चालक वाहन न थांबवता निघून गेला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chichwad Crime News 21 July 2025)
पिंपरी येथील शेवाळे सेंटर जवळ व्हिसडम पार्क सोसायटीच्या समोरील रस्त्यावर एका तरुणाला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (२० जुलै) रात्री नऊ वाजता करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल रोहीत वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार उर्फ़ आण्णा बाळु हजारे (२३, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील शेवाळे सेंटर जवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ओंकार हजारे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार ५०० रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी ओंकार याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.