Team My Pune City – पिंपरीतील रॉयल वर्ल्ड स्कूलजवळ रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसेच हॉटेल व वाहनांचीही तोडफोड केली. ही घटना रविवारी (२९ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
संविधान ऊर्फ सोनू नवीन थोरात (२१, चिंचवड), पंकज राजाभाऊ शिरसाट (१९), आयुष ऊर्फ तेजस कलेश्वर सरवदे (२०), कुणाल रमेश कांबळे (१९, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गणेश कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत लिंबराज सोनटक्के (१८, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत आणि त्यांचे मित्र आकाश गालफाडे आणि श्रेयस जेटीथोर रविवारी रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून कोयते, तलवार, पालघनसारखी हत्यारे काढून धमकावले. फिर्यादीवर हत्याराने वार करून त्याचा पाठलाग करत पुन्हा मारहाण केली. आरोपींनी आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका’ असे ओरडत परिसरात दहशत निर्माण केली.
अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवून मागितली सहा लाखांची खंडणी
अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवून ते डिलीट करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना २७ ते ३० जूनदरम्यान नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी चार अनोळखी मोबाइल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नेहरूनगर, पिंपरी येथील एका ४१ वर्षीय नागरिकाने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मैत्रीण यांचे खासगी फोटो व व्हिडिओ काही अनोळखी मोबाइल नंबरवरून पाठवण्यात आले. त्यानंतर संबंधित फोटो न व्हायरल न करता डिलीट करण्यासाठी सहा लाखांची खंडणी मागण्यात आली.
महिलेला तिघांकडून मारहाण
मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्यावरून महिलेला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (२९ जून) श्रमिकनगर, निगडी येथे घडली.
कौस अब्दुल जब्बर शेख, अब्दुल जब्बर ऊर्फ सोनू हमीद शेख, परविन आस्लम शेख (श्रमिकनगर, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मारहाण झालेल्या महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा अर्श याला आरोपीच्या मुलाने दगड मारल्याबाबत विचारणा केल्याने वाद झाला. यामध्ये तिघांनी मिळून शिवीगाळ करत हात-पाय व पाठीत दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादीचे दीर जुनेद आले असता त्यांनाही मारहाण केली.
पुणे मुंबई महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२९ जून) रात्री वाजताच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे येथे घडली.
गणेश संजय सगळे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अंकीत कुमार राकेश (३०, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. योगेश संजय सगळे (२७, पिंपरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश यांचा भाऊ गणेश हे रविवारी कार्ला येथे कामासाठी गेले होते. रात्री काम झाल्यानंतर ते दुचाकीवरून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने येत होते. तळेगाव दाभाडे येथील निलया सोसायटी समोर गणेश यांच्या दुचाकीला पाठीमागून आयशर टेम्पोने धडक दिली. या अपघातात गणेश यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पो चालक अंकित राकेश याला अटक केली आहे.
दोन दुचाकींची धडक; एकजण गंभीर जखमी
भरधाव वेगातील दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिल्याने पुढील दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (२९ जून) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर चाकण येथे घडली.
मच्छिंद्र लहान गोंडगिरे (३८, मांजरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोंडगिरे हे दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गाने जात होते. चाकण येथे सूर्या हॉस्पिटल समोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात फिर्यादीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
चिखलीत पावणे तीन लाखांची दारू जप्त
कृष्णानगर चिखली येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पावणे तीन लाखांचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (३० जून) दुपारी करण्यात आली.
निलेश कैलास अहिरे (४३, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल संतोष सपकाळ (३५) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णानगर भाजी मार्केट येथून घरकुल येथे जाणाऱ्या रस्त्यावर एकजण दारू विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत निलेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ७० हजार ८८० रुपये किमतीची देशी व विदेशी दारू आणि चारचाकी वाहन जप्त केले.