Team MyPuneCity – बस बाजूला घेण्याच्या कारणावरून बस चालकाने एका कार चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२९ मे) दुपारी चिखली येथे घडली.
विजय गेना गायकवाड (३०, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव इंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय हे त्यांच्या भाचा आणि भाचीला घेऊन चिखली येथून देहूरोड येथे कार मधून जात होते. त्रिवेणीनगर चौकाजवळ आल्यानंतर आरोपी बस चालक वैभव याच्यासोबत त्यांचा बस बाजूला घेण्यावरून वाद झाला. त्या कारणावरून वैभव याने विजय यांना शिवीगाळ करून दांडक्याने मारून गंभीर दुखापत केली.
घरासमोर चूल पेटवल्याने महिलेसह तिघांना मारहाण
महिलेने घरासमोर चूल पेटवली. या कारणावरून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने महिलेसह तिचा पती आणि सासूला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२९ मे) सकाळी जगताप चाळ, आकुर्डी येथे घडली.
याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित अशोक जगताप (२८, आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी चूल पेटवीत होत्या. त्यावेळी शेजारी राहणारा अभिजित जगताप आला. त्याने घरासमोर चूल का पेटवली, असे म्हणत फिर्यादी महिला, त्यांचे पती आणि सासू यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात फिर्यादी महिला जखमी झाली आहे.
घर ताब्यात देण्यास सांगितल्याने वडील, भाऊ, बहिणीकडून बेदम मार
माझ्या नावावर असलेले घर माझ्या ताब्यात द्या, असे मुलाने म्हटले. या कारणावरून वडील, दोन भाऊ आणि बहीण यांनी व्यक्तीच्या डोक्यात मिरची पावडर टाकून काठी आणि दगडाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२९ मे) सकाळी इंदिरानगर, पिंपरी येथे घडली.
सचिन सुभाष करडे (४३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडील सुभाष मुरलीधर करडे (७६), भाऊ अभिषेक सुभाष करडे (३०), हनुमान उर्फ दिगंबर सुभाष करडे (३०), बहीण (२५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांच्या नावावर असलेल्या घरात त्यांच्या वडील आणि भावाने भाडेकरू ठेवले होते. ते घर खाली करून त्याचा ताबा आपल्याकडे द्यावा, अशी सचिन यांनी मागणी केली. या कारणावरून वडील सुभाष, भाऊ अभिषेक आणि हनुमान यांनी सचिन यांना दगड व काठीने मारहाण केली. तर बहिणीने सचिन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.
गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक
गुटखा विक्री प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (२८) रात्री गांधीनगर, पिंपरी येथे करण्यात आली. विशाल नंदू निकाळजे (५०, पिंपरी), रियाज अजीज शेख (४६, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश दोरताले यांनी संत टुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी आले होते. पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २६ हजार ६२२ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी सात एमआर विरोधात गुन्हा दाखल
कंपनीने बक्षीस स्वरूपात दिलेल्या कार स्वतःच्या नावावर करून घेणे बंधनकारक असताना सात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) ने कार स्वतःच्या नावावर करून घेतल्या नाहीत. तसेच कंपनीतील नोकरी सोडून कंपनीचा विश्वासघात करत कार वापरल्या. याप्रकरणी सात एमआर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०११ ते मे २०२५ या कालावधीत वाकड येथे घडला.
तरणजित सिंग (चंदीगड), शिवसेन मुरुगसन (चेन्नई), प्रशांत कुमार शेट्टी (कर्नाटक), उपेंद्र सिंग (पणजी), जनमजय कुमार मंजय दिघी ), प्रीतम दास गुप्ता (दावणगिरी), जगन्नाथ दत्ता (कोलकाता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जिनोवा कंपनीतील व्यवस्थापक महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एमआर जिनोवा या औषध कंपनीत काम करत होते. डिसेंबर २०११ मध्ये त्यांना कंपनीने प्रत्येकी एक कार बक्षीस म्हणून दिली होती. त्या कार तीन वर्षात आरोपींनी स्वतःच्या नावावर करून घेणे बंधनकारक होते. मात्र तीन वर्षात आरोपींनी कार स्वतःच्या नावावर करून घेतल्या नाहीत. दरम्यान आरोपींनी कंपनीतील नोकरी सोडली. त्यानंतर कंपनीने आरोपींना कार नावावर करून घेण्याबाबत नोटीस दिली. कंपनीच्या प्रतिनिधींनी आरोपींच्या घरी भेट दिली. हजर राहण्याची आणखी नोटीस दिली. मात्र आरोपींनी कंपनीशी कोणताही संपर्क न करता कंपनीचा विश्वासघात केला आहे.
कन्स्ट्रक्शन साईटवरील साहित्याची चोरी
कन्स्ट्रक्शन साईटवर ठेवलेले सात हजार ४०० रुपये किमतीचे साहित्य चार जणांनी टेम्पो मधून चोरून नेले. ही घटना बुधवारी (२८ मे) रात्री शिल्पकार कन्स्ट्रक्शन साईट, चऱ्होली बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी राकेशकुमार धीरज सत्येंद्र सिंग (४०, चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता नागनाथ सारगे (४५, येरवडा), तन्मय सुनील दळवी (२०, विश्रांतवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह एक महिला आणि १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी टेम्पो मधून कन्स्ट्रक्शन साईटवरील साहित्य चोरी केले. चोरी केलेले साहित्य घेऊन जात असताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.