एमपीसी न्यूज – वाकड येथे एका पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यावरून झालेल्या वादातून तीन तरुणांनी पेट्रोल पंपावरील दोघांना चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) रात्री चिंतामणी पेट्रोल पंपाजवळ, अशोक नगर, ताथवडे येथे घडली.
याप्रकरणी स्वप्निल बाळासाहेब नवले (३८, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ ज्ञानेश्वर खंडाळकर (२५, वाकड) आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ खंडाळकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
Lonavala: बस प्रवासादरम्यान महिलेचे सहा लाखाचे दागिने चोरीला
फिर्यादींचा चुलत भाऊ श्रीधर नवले हा पेट्रोल पंपावर गप्पा मारत असताना,(Pimpri Chichwad Crime News 10 September 2025) पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या तीन तरुणांना पेट्रोल पंपाजवळ सिगारेट पिण्यास नकार दिल्याने वाद झाला. याचा राग आल्याने पल्सर चालकाने पेट्रोल भरणाऱ्या कामगाराला जोरदार धडक दिली. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी मदतीसाठी गेले असता, आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने वार केले. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करत आहेत.
Alandi: अर्जुन मेदनकर यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ जाहीर
Bhosari: प्रवीण गायकवाड यांना ” द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाकडून” पीएचडी पदवी प्रदान
चांगल्या परताव्याच्या आमिषाने १५.७५ लाखांची फसवणूक
चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका ५१ वर्षीय व्यक्तीची १५ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना १७ ते ३१ जुलै या कालावधीत बावधन येथे घडली.
याप्रकरणी एका ५१ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह अजय शर्मा नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले आणि त्यांची १५ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
सामाजिक कार्याचे आमिष दाखवून २.६५ कोटींची फसवणूक
सामाजिक कार्याची संधी आणि ११२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ५९ वर्षीय व्यक्तीची २.६५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोशी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडली.
याप्रकरणी मोशी येथील एका ५९ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय राजाराम खडके (कोल्हापूर), स्वामीनाथ जाधव (मोशी), ॲड. सोमनाथ कदम (निगडी), सतेंद्र विष्णुपंत मोडक (वडगाव बुद्रुक), ओंकार बजरंग जावीर (कोल्हापूर) आणि पूजा अनंत जोशी उर्फ पूजा अजित भोसले (कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय खडके आणि सोमनाथ कदम यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना सामाजिक कार्यासाठी ११२ कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारे व्याज वापरण्यास मिळेल असे सांगितले. यासाठी लागणाऱ्या ३ कोटी रुपयांपैकी २.६० कोटी रुपये एचडीएफसी बँकेतील त्यांच्या ‘श्रीयांशी टूर्स ॲन्ड ट्रॅव्हलर्स’ या खात्यात जमा करण्यास भाग पाडले. आरोपींनी फिर्यादीसोबत बनावट करारनामा, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बनावट डिमांड ड्राफ्टचा वापर करून फसवणूक केली. त्यांनी फिर्यादीचे २.६५ कोटी रुपये परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगाराला जातीवाचक शिवीगाळ
एका ऑटो सर्व्हिस सेंटरमध्ये कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह मागण्यासाठी गेलेल्या एका कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्याला तेथून हाकलून देण्यात आले. ही घटना ६ मे रोजी रिदम ॲटो, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली असून याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ३९ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निरज शितल शहा (३७, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिदम ॲटोमध्ये सेल्समन म्हणून काम करत असताना त्यांच्या कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह मागण्यासाठी आरोपीकडे गेले. त्यावेळी आरोपीने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि हाकलून दिले. याबाबत ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
जुन्या भांडणातून हॉकी स्टीक आणि लाकडी पट्टीने मारहाण
पिंपळे गुरव येथे जुन्या भांडणातून दोघांनी एका तरुणाला लाकडी पट्टी आणि हॉकी स्टीकने मारहाण केली. ही घटना सोवमारी (८ सप्टेंबर) रात्री सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे घडली.
दिपक दिगंबर चव्हाण (३८, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण उत्तम सुरवसे आणि त्याचा मित्र प्रितम सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून भूषण सुरवसे याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी पट्टीने मारहाण केली. त्याचा मित्र प्रितम सावंत याने हॉकी स्टीकने फिर्यादीच्या डोक्यावर, हातांवर, पायांवर आणि मानेवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपींनी दीपक यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
चिखली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी (८ सप्टेंबर) रात्री कुदळवाडी सर्कल, चिखली येथे घडला.
रेवंताराम बाबाराम देवासी (३२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोषदेवी रेवंताराम देवासी (२९) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शंकर बाबाराम देवासी (३०, पुनावळे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ रेवंताराम आणि त्याची पत्नी संतोषदेवी हे त्यांच्या मोटारसायकलवरून पुनावळे येथे जात असताना, अज्ञात वाहनावरील चालकाने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे गाडी चालवून त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात रेवंताराम यांच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या पत्नीच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात न नेता अज्ञात चालक पळून गेला. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या रेवंताराम यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.
घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री
भोसरी येथील एका दुकानात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस काढून छोट्या सिलेंडरमध्ये भरून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी महादेव गॅस सर्व्हिस नावाच्या दुकानात, भोसरी येथे करण्यात आली.
विजय धर्मराज संकुडे (३२, चऱ्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय संकुडे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने, कोणतीही सुरक्षा न बाळगता, घरगुती वापराच्या गॅसचा व्यवसाय करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून अवैध गॅसचा साठा, गॅस ट्रान्सफर करण्याचे साहित्य आणि एक टेम्पो असा एकूण ५ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक
चिखली येथे गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी मोरेवस्ती चिखली येथे करण्यात आली.
शंकर सुरवसे (३५, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष सपकाळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर सुरवसे हा आठ हजार ४४० रुपये किमतीचा १६२ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा आणि रोख रक्कम जप्त केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.