Team MyPuneCity – बेकायदेशीरपणे गॅस रिफील केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक( Pimpri Chichwad 26 June 2025) केली. ही कारवाई बुधवारी (25 जून) रामनगर झोपडपट्टी पिंपरी येथे करण्यात आली.
मारुती बाबुराव फुले (45, मोहननगर चिंचवड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भूपेंद्र चौधरी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फुले याने रामनगर झोपडपट्टी येथे एका गळ्यामध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडर मध्ये धोकादायकपणे कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता गॅस रिफील केला. याबाबत माहिती मिळाली असता खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत 13 हजार 700 रुपये किमतीचा गॅस साठा आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
Mumbai : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट
दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू ( Pimpri Chichwad 26 June 2025)
आळंदी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने रस्त्यावरील एका व्यक्तीला धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 22 जून रोजी रात्री घडला.
मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याचे वय सुमारे 40 वर्ष आहे. किरण भगवान लांडे (40, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद गर्जे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण लांडे हा त्याच्या दुचाकीवरून भरधाव वेगात जात होता. आळंदी मरकळ रोडवर अक्षदा हॉटेल समोर त्याने एका व्यक्तीला धडक दिली. या अपघातात अनोळखी व्यक्ती आणि किरण लांडे हे दोघेही गंभीर जखमी झाले. यामध्ये अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पार्किंगमध्ये लघुशंका करण्यास रोखल्याने तरुणाला मारहाण ( Pimpri Chichwad 26 June 2025)
पार्किंग मध्ये लघुशंका करण्यास रोखल्याने तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (24 जून) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पत्रा शेड लिंक रोड चिंचवड येथे घडली.
संदेश पावलस पवार (28, पिंपळे सौदागर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दया बेलभंडारी, गोल्या पवार, अक्षय साबळे (पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दया बेलभंडारी हा पत्रा शेड येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये लघुशंका करत होता. फिर्यादी संदेश पवार यांनी त्याला रोखले असता आरोपींनी संदेश पवार यांच्यासोबत वाद घालून त्यांना बेदम मारहाण करत जखमी केले.
Girish Prabhune : भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा ( Pimpri Chichwad 26 June 2025)
किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (25 जून) सायंकाळी नेहरूनगर पिंपरी येथे घडली.
शुभम श्यामलाल धोत्रे (25, नेहरूनगर पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल मोहम्मद शेख (24), साहिल महंमद शेख (20), निजाम मोहम्मद शेख (26, नेहरूनगर पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल शेख यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी बाहेर जाऊन बोलू असे म्हटले असता आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करत जखमी केले. लाकडी बांबूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले.
गुंतवणुकीच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक ( Pimpri Chichwad 26 June 2025)
गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून एका आयटी अभियंत्याची 48 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑगस्ट 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.
महेश राजेशाम बाले (38, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अन्या स्मित आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. त्यामध्ये फिर्यादी यांना गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कंपनीचे एक एप्लीकेशन डाउनलोड करून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. इतर नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला नफा झाल्याचे फिर्यादी यांना सांगण्यात आले. दरम्यान फिर्यादी यांनी केलेल्या गुंतवणुकीवर मोठी रक्कम जमा झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेत त्यांची एकूण 48 लाख 38 हजार 824 रुपयांची फसवणूक केली.