Team My Pune City – पुणे शहरात आता ४२ मजल्यांपर्यंतच्या ( Permission For 42 floors in Pune) गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी ७० मीटरपेक्षा म्हणजेच सुमारे २४ मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारतींसाठी महापालिकेच्या हाय राइज समितीकडे परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र राज्य सरकारच्या नगर रचना विभागाचे अवर सचिव प्रवीण कर्पे यांनी दिलेल्या आदेशानुसार आता १२० मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींसाठी समितीकडे जाण्याची गरज राहणार नाही.
डिसेंबर २०२० मध्ये राज्य सरकारने लागू केलेल्या ( Permission For 42 floors in Pune) यूडीसीपीआर (Unified Development Control and Promotion Regulations) नियमावलीत हाय राइज समितीची अट रद्द करण्यात आली होती. तरीही पुणे महापालिकेने स्वतःच्या पातळीवर अशी समिती स्थापन केली होती, ज्यामुळे परवानगी प्रक्रियेत विलंब होत होता. बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई पुणे मेट्रोसह अनेक संस्थांनी ही अट रद्द करण्याची मागणी केली होती.
नव्या आदेशानुसार १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर अशा इमारती उभारता येतील, मात्र प्लॉट क्षेत्रफळाचे बंधन लागू राहणार आहे. सर्वसाधारणपणे एका मजल्याची उंची सुमारे २.८५ मीटर असते, त्यामुळे १२० मीटर उंचीपर्यंत परवानगी मिळाल्यास ४२ मजल्यांची इमारत बांधता येईल. या निर्णयामुळे पुण्यातील बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यातही गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला ( Permission For 42 floors in Pune) आहे. यामुळे शहराच्या आकाशरेषेत मोठा बदल दिसून येणार आहे.
.


















