Team MyPuneCity — पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांत सध्या नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्याची (PCMC Water) चव व वास बदलल्याची तक्रार नागरिकांकडून येत असली, तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, ही चव बदलण्याची कारणे नैसर्गिक असून पाणी पूर्णतः पिण्यायोग्य आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रियेअंतीच त्याचे वितरण करण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीत गाळ, झाडपाला व सांडपाण्यासह इतर कचरा वाहून येतो. परिणामी नदीतील पाणी गढूळ होते आणि त्यात टीडीएस — म्हणजेच एकूण विरघळलेल्या घन पदार्थांचे प्रमाण वाढते. याचा परिणाम पाण्याच्या (PCMC Water) चव व वासावर होतो. मात्र, या स्थितीतही जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण अभियांत्रिकी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच नागरिकांना पाणी पुरवले जाते.
Maval: मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
पिंपरी-चिंचवड शहराला पवना व आंद्रा धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पावसाळ्यातील चार महिने धरणातील साठा न वापरता नदीतील पाण्याचा वापर केला जातो. अशा वेळी रावेत बंधाऱ्यावरून उचललेले अशुद्ध पाणी प्राधिकरण व निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रांत पाठवले जाते. तसेच आंद्रा धरणातील पाणी निधोजे बंधाऱ्यावरून उचलून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करून पाणी (PCMC Water) स्वच्छ करून ते विविध टाक्यांत साठवले जाते आणि नंतर शहरभर वितरण केले जाते.
महापालिकेने केलेले उपाय
- जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये जागतिक मानकांनुसार प्रक्रिया केली जाते.
- नळपाणी योजना व टाक्यांची नियमित स्वच्छता केली जाते.
- गढूळ पाण्याच्या तक्रारींवर तत्काळ दखल घेतली जाते.
- दररोज पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते.
- किंचित चव बदलली असली तरी पाणी पूर्णतः पिण्यायोग्य आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख प्रमोद ओंभासे यांनी सांगितले की, “नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीस पाणी थोडे गढूळ होणे हे सर्वत्र स्वाभाविक आहे. नागरिकांनी पाणी उकळून वापरावे. गढूळ पाण्याच्या तक्रारी असलेल्या भागांवर महापालिकेचे विशेष लक्ष आहे.”
तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्पष्ट केले की, “शहरवासीयांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी (PCMC Water) मिळावे, यासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग कटिबद्ध आहे. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया जागतिक आरोग्य संघटना व पर्यावरण अभियांत्रिकी संघटनेच्या मानकांनुसार केली जाते. ज्या भागांत गढूळ पाणी येत आहे, तेथील नागरिकांनी तात्काळ स्थानिक पाणीपुरवठा कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अशा तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाईल.”
महापालिकेच्या स्पष्टतेनंतर नागरिकांनी घाबरून न जाता काळजीपूर्वक पाणी वापरणे आणि गरज असल्यास पाणी उकळून पिणे यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.