Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड आरक्षणामुळे थेरगावमधील सुमारे १३५० घरे बाधित होणार आहेत. यामुळे सुमारे १५ हजार नागरिक बेघर होण्याच्या संकटात सापडले असून, या अन्यायकारक आराखड्याविरोधात थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीने सोमवारी (दि. ३० जून) थेरगाव बंद आणि महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र माने यांनी, “ही केवळ निषेधाची लढाई नसून आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. महापालिकेचा आराखडा सामान्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. थेरगावमधील एकही वीट आम्ही हलू देणार नाही,” असा संतप्त इशारा दिला आहे. त्यांनी सर्व थेरगावकरांना मतभेद विसरून स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चाचे वेळापत्रक आणि मार्ग
सोमवारी सकाळी १६ नंबर बस स्टॉप येथून महामोर्चाला सुरुवात होणार असून तो काळेवाडी फाटा, राहाटणी फाटा, थेरगाव गावठाण मार्गे मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप
महापालिकेच्या आराखड्यामुळे गोरगरीब, कष्टकरी, कामगार, व्यापारी वर्गावर मोठे संकट कोसळणार आहे. आयुष्याची पुंजी खर्चून उभारलेली घरे काही मिनिटांत जमीनदोस्त होण्याच्या भीतीने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘थेरगाव बंद’ची हाक दिली असून, सर्व पक्ष, संघटना, जाती-धर्मापलीकडचे नागरिक एकत्र येऊन या लढ्यात सामील होणार आहेत.
आवाहन
“हा संघर्ष विकासाच्या नावाखाली थेरगावकरांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आराखड्याविरोधात आहे. त्यामुळे प्रत्येक थेरगावकराने यात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.