मुंबई शेअर बाजारात नवा इतिहास; 200 कोटींचा निधी उभारला, 5.13 पट मागणी
Team MyPuneCity – देशात पहिल्यांदाच कोणतीही महानगरपालिका ‘ग्रीन म्युनिसिपल बाँड’द्वारे निधी उभारण्यात यशस्वी ठरली असून पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुंबई शेअर बाजारात या बाँडचं यशस्वी लिस्टिंग करण्यात आलं. 200 कोटींचा निधी महापालिकेने उभारला असून गुंतवणूकदारांकडून तब्बल 513 कोटींच्या निविदा मिळाल्या, म्हणजेच या बाँडला 5.13 पट मागणी मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे ग्रीन म्युनिसिपल बाँडचे लिस्टिंग सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे यांच्यासह वरिष्ठ प्रशासन अधिकारी व महापालिका आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.



महापालिकेवर गुंतवणूकदारांचा विश्वास
महापालिकेच्या या उपक्रमाला उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. बाँड लिस्ट होताच अवघ्या एका मिनिटात 100 कोटींचा मूळ निधी जमा झाला. क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त पतमापन संस्थांकडून या बाँडला ‘AA+’ दर्जा प्राप्त झाला आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी 7.85 टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

निधीचा उपयोग कोणत्या प्रकल्पांसाठी?
या माध्यमातून उभारलेला निधी ‘हरित सेतू प्रकल्प’ आणि ‘टेल्को रस्ता विकास’ या दोन महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. हरित सेतू ही योजना पादचारी आणि सायकलस्वारांसाठी विशेष रस्ता प्रणाली निर्माण करणार असून ती बस स्थानक, मेट्रो, शाळा, महाविद्यालये, बँका, उद्याने व धार्मिक स्थळांशी जोडणारी असेल. त्यामुळे वाहनांची गर्दी कमी होऊन प्रदूषणात घट होईल आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळेल.
मुख्यमंत्र्यांकडून आयुक्तांचे कौतुक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे विशेष कौतुक करत, “ही कामगिरी इतर महापालिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महापालिकांना कॅपिटल मार्केटमधून निधी उभारण्यावर भर दिला असून पिंपरी-चिंचवडने त्याचा यशस्वी प्रारंभ केला,” असे ते म्हणाले.
पुढचे पाऊल – सोशल, हाउसिंग व एनर्जी बाँड्सकडे
“ग्रीन बाँडला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महापालिकेवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. याच धर्तीवर आता सोशल बाँड्स, हाउसिंग बाँड्स, रिन्यूएबल एनर्जी आणि वॉटर रीयुज प्रकल्पांसाठीही निधी उभारावा,” अशी अपेक्षा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाचा क्षण
या ऐतिहासिक यशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला केंद्र सरकारकडून 20 कोटींचा प्रोत्साहन निधीही मिळणार आहे. पर्यावरणपूरक शहर विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल शहरवासीयांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.