पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष स्क्रीनिंगचे आयोजन
Team MyPuneCity -पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्यात सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवित असते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सफाई सेवकांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी मराठी चित्रपटाचे सोमवारी (२ जून) खास स्क्रीनिंगचे आयोजन पिंपरी येथील विशाल सिनेमाज् येथे करण्यात आले आहे.
सदर चित्रपट हा महानगरपालिकेतील कर्तबगार सफाई सेवकांच्या दैनंदिन जीवनावर आधारित असून, त्यांच्या कार्यात येणाऱ्या अडचणी, अनुभव व संघर्ष यांची प्रामाणिक मांडणी यात करण्यात आली आहे. ही कलाकृती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेणारी असून, मराठीत अशा प्रकारचा चित्रपट प्रथमच सादर होत आहे.
PCMC: नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार
या चित्रपटाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या सफाई सेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, कामाबाबत सजगता वाढवणे व त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे सफाई सेवकांना त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल तसेच समाजातील त्यांच्या योगदानाबाबत जागरूकता निर्माण होईल व या चित्रपटांच्या माध्यमातून सफाई सेवकांना जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.
-शेखर सिंह
आयुक्त तथा प्रशासक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
या सफाई सेवकांसाठी महापालिकेने राबविलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून सफाई सेवकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांच्या माध्यमातून सफाई सेवकांना निश्चित प्रेरणा मिळेल त्यासाठी भविष्यात देखील स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत सफाई सेवकांसाठी अशा चित्रपटांचे आयोजन केले जाणार आहे.
-सचिन पवार
उप आयुक्त , आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
——–