Team My Pune City –श्रावण महादेवाची भक्ती करण्याचा पवित्र महिना (Omkareshwar Jyotirlinga)तसे तर आपण १२ हि महिने देवाची भक्ती करतो पण या महिन्यास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. अशा या श्रावणात आपण १२ ज्योतिर्लिंगाची माहिती पाहणार आहोत.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी चौथे आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील इंदूरजवळ नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे. ओंकार या पवित्र चिन्हाच्या आकाराच्या डोंगरावर असलेले हे ज्योतिर्लिंग, हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जाते.
Mallikarjuna Jyotirlinga: कथा दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची मल्लिकार्जुन महादेवाची
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बाबत अनेक कथा सांगितल्या जातात.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कसे स्थापन झाले
एकदा विंध्याचल पर्वता स्वतःवर खुप अहंकार होता.तो देवर्षी नारदासमोर आपल्या श्रेष्ठत्वाचे गुणगान गाऊ लागला होता. विंध्याचल पर्वताचा हा अहंकार पाहून देवर्षीने त्याला मेरु पर्वताविषयी सांगितले. देवर्षीने मेरु पर्वत विंध्याचल पर्वतापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले. देवर्षींनी विंध्याचल चा अहंकार दूर केला. विंध्याचल पर्वत खुप दुःखी झाला. त्याने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या सुरु केली.
विंध्याचल पर्वताने नर्मदा नदीच्या काठावर कठोर तप केला . ज्या ठिकाणी ओंकारलिंग होते, त्या ठिकाणी या पर्वताने सहा महिने कठोर तप केले. विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवाने दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले.विंध्याचल पर्वताने देवाला बुद्धी प्रदान करण्यास सांगितले. यासोबत नेहमीसाठी या ठिकाणी स्थापित होण्याची विनंती केली. विंध्याचल पर्वताची इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेव एका ओंकारलिंगातून दोन रुपांमध्ये विभक्त झाले. एक ओंकार नावाने प्रसिध्द झाले तर दुसरे पार्थिव मूर्तीमध्ये अमलेश्वर रुपात स्थापित झाले. अशाप्रकारे महादेव येथे दोन रुपांमध्ये स्थापित आहेत.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बाबत अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत. त्यातली दुसरी कथा म्हणजे ओंकारेश्वर धाम मन्धाता बेटावर स्थित आहे. मन्धाता बेटावर राजा मान्धाताने पर्वतावर कठीण तपस्या केली होती. त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले. तेव्हा राजाने वरदान स्वरुपात येथे निवास करण्याचं वरदान मागितलं.त्यानंतर राजाला दिलेल्या वचनानुसार भगवान शिव येथे पवित्र ज्योतिर्लिंगाच्या रुपात विराजमान झाले. या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक जनतेची सुरक्षा आणि रक्षा भगवान शिव स्वयं करतात. प्राचीन कथांनुसार, ओंकारेश्वरला तीर्थ नगरी ओंकार-मान्धाताच्या नावाने प्राचीन काळात ओळखलं जात होतं.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बाबत हिंदू धर्मग्रंथांमधील तिसरी कथा अशी कि देव आणि दानव यांच्यात एक मोठे युद्ध झाले होते, ज्यामध्ये दानवांचा विजय झाला. देवांसाठी हा एक मोठा धक्का होता आणि म्हणूनच देवांनी शिवाची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन, शिव ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाला आणि दानवांचा पराभव केला.