निगडीकरांचा आवाज बुलंद, सचिन काळभोर यांचा आंदोलनाचा इशारा
Team MyPuneCity -संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ( Nigdi )ही पिंपरी-चिंचवड शहरासाठी केवळ धार्मिक परंपरा नाही, तर अस्मितेचा प्रश्न बनला आहे. ३४० वर्षांची अखंड परंपरा लाभलेली ही पालखी यंदाही १८ जून २०२५ रोजी देहू येथून प्रस्थान ठेवणार असून १९ जून रोजी निगडी गावठाणात पोहोचेल. मात्र, पिंपरी ते निगडी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे पारंपरिक मार्ग बदलण्याची शासकीय चर्चा सुरू झाली असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
Alandi: डॉ नारायण महाराज जाधव यांना आळंदी भूषण वारकरी पुरस्कार
मेट्रो कामामुळे बदलाचा प्रस्ताव, भाविक संतप्त
भक्ती शक्ती उड्डाणपुलाजवळ मेट्रोचे काम सुरू असल्याने पालखी मार्ग वळवण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासन व शहर पोलीस विभागाच्या संयुक्त बैठकीत मांडण्यात आला. श्रीकृष्ण मंदिरमार्गे पालखी नेण्याची शक्यता सुचवण्यात येत असून, याला निगडी गावठाण, मारुती मंदिर व बस स्टॉप परिसरातील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
“ही आमच्या श्रद्धेवर घाला” – स्थानिकांचा आक्रोश
निगडी गावठाणातील पारंपरिक मार्गावरच पालखी यावी, अशी आग्रही मागणी वारकरी, स्थानिक मंडळे व नागरिकांनी केली आहे. वारकऱ्यांना अन्नदान, सेवा व स्वागतासाठी दरवर्षी या मार्गावर नियोजन केले जाते. पालखी मार्ग बदलल्यास या भावनिक, धार्मिक नात्यांना तडा जाईल, अशी भावना ( Nigdi )व्यक्त होत आहे.
यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
“पालखी मार्ग बदलण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. ही आमच्या अस्मितेची बाब आहे,” असा ठाम इशारा शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे. त्यांनी प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
- पारंपरिक मार्ग – भक्ती शक्ती उड्डाणपूल > निगडी गावठाण > मारुती मंदिर > निगडी बस स्टॉप > आकुर्डी विठ्ठल मंदिर कायम ठेवावा
- प्रशासनाने पर्यायी मार्ग नाही, तर पर्यायी व्यवस्था करावी
- वारकऱ्यांच्या श्रद्धेला प्राधान्य द्यावे
- लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून समस्या सोडवावी
एकत्रित आवाज, एकच मागणी – परंपरा अबाधित राहावी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचा आणि शहराच्या धार्मिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग. प्रशासनाने या परंपरेत अडथळा न आणता योग्य व्यवस्थापन करून मार्ग खुला ठेवावा, हीच सर्व नागरिकांची अपेक्षा ( Nigdi ) आहे.