Team MyPuneCity – चिंचवड येथील एम्पायर इस्टेट परिसरातून जाणाऱ्या मदर टेरेसा उड्डाण पुलावर (Mother Teresa Flyover) चढण्या-उतरण्यासाठी असलेल्या जिन्यांची (रॅम्प) परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता या जिन्यांजवळ त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक बनले आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी केली आहे.
दारू, गांजाचे अड्डे आणि अस्वच्छता
दररोज रात्री या जिन्यांवर अनेक तरुण मद्यपान आणि गांजाचे सेवन करत बसलेले असतात. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने, हे दोन्ही जिने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी एक सुरक्षित अड्डा बनले आहेत. रात्रीच्या वेळी अनेकजण येथे बसून परिसरात घाण करतात, ज्यामुळे नागरिकांना या जिन्यांचा वापर करणे कठीण झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजनांचा अभाव
या जिन्यांवर (Mother Teresa Flyover) अनेकदा लाईट बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असल्याने येथून प्रवास करणे धोकादायक ठरते. विशेषतः महिला आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. याशिवाय, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने येथे होणाऱ्या गैरप्रकारांची कुठलीही नोंद घेतली जात नाही. त्यामुळे या भागात चोरी, गैरवर्तन किंवा इतर गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे अग्रवाल यांनी लक्ष वेधले आहे.
जिन्यांची दुर्दशा आणि चोरीच्या घटना
या जिन्यांवर असलेल्या लोखंडी संरचनेचा काही भाग अज्ञात व्यक्तींनी चोरी केला आहे. परिणामी जिने वापरणे अधिकच अवघड आणि धोकादायक बनले आहेत. नागरिकांनी या भागाची डागडुजी करण्याची मागणी अनेक वेळा केली असली तरी, अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Maval Crime News : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
महानगरपालिकेने त्वरित पावले उचलावीत
या समस्येवर त्वरित उपाययोजना (Mother Teresa Flyover) करण्याची मागणी राजेश अग्रवाल यांनी केली आहे. त्यांनी महानगरपालिकेकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
- सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत: सुरक्षा लक्षात घेता जिन्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सतत नजर ठेवावी.
- प्रकाशयोजना सुधारावी: जिन्यांवर कार्यरत स्ट्रीट लाईट बसवण्यात यावेत जेणेकरून रात्रीच्या वेळी अंधार राहणार नाही.
- नियमित साफसफाई: जिन्यांची स्वच्छता नियमित केली जावी, त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास होणार नाही.
- पोलीस गस्त वाढवावी: रात्रीच्या वेळी येथे पोलीस बंदोबस्त असावा जेणेकरून गैरप्रकार थांबवता येतील.
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन लवकरात लवकर या भागात सुधारणा होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात या ठिकाणी (Mother Teresa Flyover) एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर राहील, असा इशाराही अग्रवाल यांनी दिला आहे.