Team MyPuneCity – दरवर्षी साधारणतः सात जूनला दक्षिण कोकणात तर दहा जूनच्या सुमारास मान्सून (Monsoon) पुण्यात दाखल होतो. यावर्षी तब्बल पंधरा दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.
दक्षिण-पश्चिम मान्सूनने आज आणखी काही भागांमध्ये आगेकूच करत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत आगमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने मध्य अरबी समुद्रातील काही भाग, महाराष्ट्रातील मुंबई पुणे, सोलापूरसह काही भाग, बंगळुरूसह कर्नाटक, तामिळनाडूचे उर्वरित भाग, तेलंगणा व आंध्र प्रदेशचे काही भाग, तसेच पश्चिम व उत्तर बंगालच्या उपसागराचे काही भाग व्यापले (Monsoon)आहेत.
आज, २६ मे रोजी मान्सून त्रिपुरा, मणिपूर, मिझोरामसह ईशान्य भारतातील नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम व मेघालयाच्या काही भागांतही पोहोचला आहे. यामुळे ईशान्य भारतातही पावसाळ्याची जोरदार सुरुवात झाली आहे.
पुढील तीन दिवसांत मान्सून पुढे जाण्याची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, महाराष्ट्राचे उर्वरित भाग, कर्नाटकाचे शिल्लक भाग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आणखी काही भाग, तसेच उपसागराच्या पश्चिम व उत्तर भागात पुढे सरकण्याची अनुकूल परिस्थिती आहे. शिवाय, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल व सिक्कीममधील काही भागांमध्येही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
या वर्षी मान्सूनचे (Monsoon) आगमन सामान्य वेळेआधीच झाले असून, याचा फायदा शेतीला आणि जलसाठ्यांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील शेतकरी वर्गासाठी ही दिलासादायक बातमी आहे.