Team MyPuneCity –मावळ तालुक्यातील १ हजार शेतकरी येत्या खरीप हंगामात शुद्ध, प्रमाणित इंद्रायणी भाताची लागवड करणार असल्याची माहिती मावळ ऍग्रोचे संस्थापक तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली. शुद्ध, प्रमाणित इंद्रायणी भाताची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मावळ ॲग्रो कडून बियाणे व सेंद्रिय खते पुरवली जाणार आहेत.
मावळ तालुका हा खरीप भात पीक घेण्यात राज्यात आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी पावसावर येणारे खरीप भात पीक शेतकरी घेत असतात. तालुक्यामध्ये एकूण भात पीक लागवडी खाली १३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. अनुकूल वातावरणामुळे आणि भरपूर पावसामुळे या ठिकाणी इंद्रायणी सुवासिक भातपीक शेतकऱ्यांना चांगला आधार देऊन जाते. शेतकरी जवळ जवळ ९०% खरीपाच्या हंगामात भात पीक घेतात.
Pune Crime News 19 May 2025 : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकास अटक

मावळ ॲग्रो मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना शुद्ध, प्रमाणित इंद्रायणी बी- बियाणे देत आहे. सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांना बियाणांबरोबर सेंद्रिय खते देखील पुरवली जात असून पीक घेण्याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या खरीप इंद्रायणी भाताची खरेदीही मावळ ॲग्रो कडून केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना चांगला भाव दिला जातो. राज्य शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी इंद्रायणी भात पीक घेण्याकडे आकर्षित झाले आहेत. गेल्या वर्षी मावळ ॲग्रोने शुद्ध आणि प्रमाणित बियाणे राहुरी कृषी विद्यापीठाकडून आणून ते शेतकऱ्यांना वाटप केले होते. तर त्या बियांणापासून उत्पादित झालेले भात मावळ ॲग्रोने खरेदी करून ते शेतकऱ्यांना यावर्षी वाटप करणार आहेत.

मावळ तालुक्यातील विविध गावांमधील शेती विकास सोसायटींच्या मार्फत तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठा धोरणानुसार शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देऊन इंद्रायणी भाताचे उत्पादन कसे वाढेल यासाठी देखील मावळ ऍग्रो प्रयत्न करत आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुद्ध, प्रमाणित बियाणे व सेंद्रिय खते वापरावीत यासाठी मावळ ॲग्रो पवन मावळ, नाणे मावळ व अंदर मावळ विभागात शेती विकास सोसायटी माध्यमातून इंद्रायणी भात पिकांबाबत जनजागृती करत आहेत. काही ठिकाणी सेंद्रिय खते कशी वापरावीत याबाबत माहिती व अभ्यास वर्ग घेतले जात आहेत.