Team MyPuneCity -‘शून्य विद्युत अपघाता’च्या जनजागृतीसाठी महावितरणच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये शुक्रवारी (दि. ६) सकाळी १० ते १०.१५ वाजेदरम्यान पुणे परिमंडलातील साडेपाच हजारांवर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांमध्ये एकाचवेळी विद्युत सुरक्षेची शपथ ( Mahavitran) घेतली.
वर्धापन दिनानिमित्त पिंपरी येथे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे (महावितरण) व अनिल कोलप (महापारेषण), विद्युत निरीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली.
तर पुणे परिमंडल अंतर्गत मंडल, विभाग, उपविभाग व शाखा यासह २४४ कार्यालयांमध्ये साडेपाच हजारांवर सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी, बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री ज्ञानदेव पडळकर, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अमित कुलकर्णी, विठ्ठल भुजबळ, अनिल घोगरे, संजीव नेहते आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच ग्राहकांच्या तक्रारींची ताबडतोब दखल घेऊन त्यांच्याही सुरक्षिततेची काळजी ( Mahavitran) घेण्याची शपथपूर्वक ग्वाही देण्यात आली.
लाखांवर नागरिकांशी संवाद साधत विद्युत सुरक्षेचा जागर
पुणे परिमंडलामध्ये विद्युत सुरक्षेचा जागर करण्यासाठी रविवारी (दि. १) सप्ताहाला संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या मुख्य उपस्थितीत प्रारंभ झाला. यात चिंचवड येथे ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनमध्ये तब्बल १ हजार ३६१ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांनी सहभागी होऊन विद्युत सुरक्षेचा जागर केला.
यानंतर महावितरणच्या मोबाइल अॅप व वेबसाइटद्वारे ऑनलाइन विद्युत सुरक्षा प्रश्नमंजूषेमध्ये पुणे परिमंडलातील साडेपाच हजारांवर अभियंते, अधिकारी, कर्मचारी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी १०० टक्के सहभाग नोंदवत प्रमाणपत्र मिळवले आहे. शालेय विद्यार्थी व वीजग्राहकांनीही स्वतंत्र ऑनलाइन प्रश्नमंजूषेला मोठा प्रतिसाद मिळाला. यासह सर्वच १२ विभाग अंतर्गत शालेय विद्यार्थी व कर्मचारी पाल्यांसाठी विद्युत सुरक्षेवर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला.
विद्युत सुरक्षा सप्ताहात पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, जुन्नर, खेड, मावळ, हवेली, आंबेगाव, तालुक्यांमध्ये महावितरणकडून प्रबोधनाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील गर्दीचे ठिकाणे, शहरातील रहिवासी सोसायट्यांमध्ये विद्युत सुरक्षेची थेट संवाद साधून माहिती देण्यात आली. यासह प्रत्येक विभागात प्रभात फेरी, बाईक रॅली, मोठे फलक, पोस्टर्स तसेच पॅम्पेलट्द्वारे हजारो नागरिकांशी थेट संवाद साधून विद्युत सुरक्षेची माहिती देण्यात ( Mahavitran) आली.