Team MyPuneCity – लोणावळा शहराजवळ असलेल्या भुशी धरणात बुडून दोन पर्यटक तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (८ जून) दुपारी घडली. साहिल अशरफ अली शेख (१९), मोहम्मद जमील (२२, थेरगाव, पुणे. मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
साहिल आणि जमील हे दोघे रविवारी सकाळी लोणावळा परिसरातील भुशी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये फिरण्यासाठी आले होते. दोघेही दुपारी धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना माहिती मिळताच त्यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा या पथकाला पाचारण केले.
शिवदुर्गचे महेश मसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणी नंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.