मावळ ऑनलाईन – “मी तुझ्यासाठी चांगले काम शोधतोय, तू चांगला रहा” असे सांगितल्याने चिडलेल्या तरुणाने समोरच्याला जबर मारहाण करत पाठीमागून बांधकामाच्या प्लायवूडने डोक्यात घाव घातला. या हल्ल्यानंतर तरुण बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला मोटारसायकलवरून फरफटत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या घटनेत त्याच्या उजव्या पायाच्या तीन बोटांना फ्रॅक्चर झाले. लोणावळ्याच्या रामनगर भागात ११ मे रोजी रात्री ही धक्कादायक घटना घडली.
फिर्यादी नकुल संदीप उठवाल (वय २०, व्यवसाय – नोकरी, रा. रामनगर, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दीपक खारवे (रा. घर क्र. १००, रामनगर, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याच्याशी त्यांचा पूर्वीपासून ओळख होती. नकुल यांनी “तू चांगला रहा, मी तुझ्यासाठी चांगले काम शोधतोय” असे सांगितल्यावर दीपकने रागाच्या भरात चिडून अचानक पाठीमागून प्लायवूडचा फटकारा त्यांच्या डोक्यात घातला.
Pune: कॉ. अजित अभ्यंकर, डॉ. संजय नगरकर यांना ‘विश्वबंधुता भूषण पुरस्कार’ जाहीर
या हल्ल्यामुळे नकुल उठवाल हे जागीच बेशुद्ध झाले. नंतर आरोपीने त्यांना मोटारसायकलवरून हॉस्पिटलकडे नेताना फरफटवले, त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाच्या तीन बोटांना फ्रॅक्चर झाले आहे.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आरोपी दीपक खारवेविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भिसे पुढील तपास करत आहेत.