पुढील पाच वर्षांत उद्योगांचे वीजदर कमी होणार
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन
Team Pune City –आतापर्यंत आपण दरवर्षी वीज दरवाढ (Lokesh Chandra)करत आलो आहोत. परंतु इतिहासात पहिल्यांदाच आपण औद्योगिक वीजदर कपात केली आहे. दरवर्षी सरासरी १.९ टक्के प्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये १० टक्के दर कमी होतील. तसेच उद्योगांची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी उद्योजकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
शुक्रवारी (दि. 8) गणेशखिंड येथील महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयात पुणे शहरातील उद्योजक संघटनांसोबत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी संवाद साधला. यावेळी महावितरणचे संचालक (संचालन) सचिन तालेवार, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (मासं) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत व दिनेश अग्रवाल, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे यांचेसह शहरातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकेश चंद्र म्हणाले, ‘भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियनचा असून, त्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पाऊले उचलली आहेत. यामध्ये वीज कंपन्यांनाही त्यांचे योगदान द्यावे लागणार आहे. सौरऊर्जेतून स्वस्तात मिळणारी वीज शेतकऱ्यांना दिवसा देऊन शेतीसोबत उद्योगांनाही त्याचा फायदा मिळणार आहे. वीजदर कपात करुन एक पाऊल पुढे टाकलेलेच आहे. महावितरण व महापारेषण या कंपन्या विजेच्या पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करीत आहेत.’
पुण्यातील उद्योजकांची वाढती वीज मागणी लक्षात घेता महावितरणने एमआयडीसीकडे नविन वीज उपकेंद्रांसाठी जागेची मागणी केली आहे. एमआयडीसी याबाबत सकारात्मक असून, सर्व्हे करुन नविन जागेचा शोध घेतला जाणार आहे. नविन जागांसाठी महावितरण आग्रही आहे. तसेच नव्याने विस्तारित होणाऱ्या औद्योगिक वसाहतींचा बहृत आराखडा तयार करतानाच वीज उपकेंद्रांसाठी जागेचे आरक्षण टाकण्यात यावे यासाठीही महावितरण पाठपुरावा करत असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.
‘स्वागत कक्षा’ची सुरुवात
उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ‘स्वागत कक्षा’ची निर्मिती केलेली आहे. प्रत्येक मंडल कार्यालय स्तरावर हा कक्ष कार्यरत असून, उद्योजक व महावितरण यांच्यातील समन्वय वाढून वीज सेवा गतिमान होण्यास त्याची मदत होणार आहे. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता महिन्यातून एकदा स्वागत कक्षाची बैठक घेऊन समस्या मार्गी लावतील असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.
‘लोड ब्रेक स्विच’चा वापर करावा- लोकेश चंद्र
वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारीवर उत्तर देताना सीएमडी लोकेश चंद्र म्हणाले, ‘जिथे दाब वाढविण्याची गरज आहे. तिथे तो तातडीने वाढवून देण्याच्या सूचना संबंधित अभिंयंत्यांना दिलेल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होण्यामागे अंतर्गत बिघाड हे देखील एक कारण आहे. एखाद्या उद्योगाच्या अंतर्गत बिघाडामुळे त्या फिडरवरील इतर ग्राहकांनाही खंडित विजेचा फटका बसतो. त्यामुळे उद्योगांनीही ‘लोड ब्रेक स्विच’चा वापर करावा. त्यासाठी उद्योगांनीही पुढाकार घ्यावा. हे बसविल्याने 50 टक्के ट्रिपिंग कमी होतील.’ त्यास उद्योगांनी पसंती दिली.