Team My Pune City – मध्य रेल्वेच्या लोणावळा-पुणे विभागातील खडकी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बाधणी आणि विस्तारीकरणाच्या कामाचा परिणाम दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात जाणवला. पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या गाड्यांना रविवारी विलंब झाला. याबरोबरच 13 लोकल सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा-महाविद्यालय आणि कार्यालयीन सुटी असल्याने लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी आज( सोमवार) गाड्यांचा थांबा सुरू करण्यात येणार असून, लोकल सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
रद्द करण्यात आलेल्या 13 उपनगरीय रेल्वेच्या सेवेत पुणे-लोणावळा, पुणे-तळेगाव, इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईमू) समावेश आहे. रविवारची सुटी असल्याने फारसा परिणाम जाणवला नसला, तरी इतर कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला.
Pimpri Chichwad Crime News 14 July 2025 : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा
पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी खडकी आणि हडपसर या स्थानकांची पुनर्बाधणी करण्यात येत आहे. या स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याने विस्तारीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. सद्यःस्थितीत खडकी रेल्वे स्थानकातील चार आणि पाच या फलाटांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. सुमारे 75 टक्क्यांहून अधिक काम झाले असून, तांत्रिक सुविधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Crime News : दुकानात शिरून महिलेला मारहाण करत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, कुसगाव येथील घटना
त्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री 12 पासून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि रविवारी (13 जुलै) दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर दुसऱ्या दिवशीही परिणाम जाणवला असल्याचे दिसून आले. दरम्यान, पुणे-लोणावळा-पुणे, पुणे-तळेगाव-पुणे मार्गावरील दैनंदिन 13 लोकलची सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने अनेक प्रवाशांना रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागला.
खडकी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बाधणी आणि विस्तारीकरणाच्या कामांपैकी तांत्रिक सुविधांचे नियोजन असल्याने या स्थानकावरून रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला होता. आजपासून (14 जुलै) सेवा पूर्ववत करण्यात येणार असून, नियोजित वेळापत्रकानुसार गाड्या धावतील. – हेमंत बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग