Team My Pune City – गेल्या महिनाभरात दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेला ठार करणाऱ्या नरभक्षक बिबट्यामुळे ( Leopard in the Manchar) परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने संबंधित बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी वनविभाग आणि खासगी संस्थांनी मिळून तब्बल 11 पिंजरे लावले होते. अखेर मंचर येथे एका पिंजऱ्यात बिबट्या सापडला आहे. मात्र, हा बिबट्या नरभक्षकच आहे का, याची अद्याप खात्री झालेली नाही. त्याच्या शरीरात मानवी अवशेष आढळतात का, याची तपासणी होणार असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, या हल्ल्यांमुळे संतप्त नागरिकांनी काही दिवसांपूर्वी ( Leopard in the Manchar) नाशिक–पुणे महामार्गावर रास्ता रोको करून जाळपोळ केली होती. तब्बल 16 तासांनंतर पोलिस आणि प्रशासनाने समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नागरिकांच्या 11 मागण्या वनविभागाने मान्य केल्या होत्या.
गेल्या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लहान मुलाचे अंत्यसंस्कार नुकतेच पार पडले. या घटनांमुळे बिबट्यांचे वाढते हल्ले हा गंभीर प्रश्न बनला असून स्थानिक राजकारण्यांनी “बिबटे वाचवायचे की माणसं” असा थेट सवाल सरकारसमोर उपस्थित केला ( Leopard in the Manchar) आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपळखेड परिसरात वनविभागाचे विशेष पथक दाखल झाले असून जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर या चार तालुक्यांत सुमारे 1200 बिबटे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. दर 10 चौरस किलोमीटर क्षेत्रात किमान एक बिबट्या असल्याचेही सांगण्यात आले.
गेल्या महिन्यात तीन जणांचा बळी गेल्याने वनविभागावर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात वनमंत्री बैठक घेणार असून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी या बैठकीवर बहिष्कार ( Leopard in the Manchar) टाकला आहे.


















