Team My Pune City – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रविवारी दुपारी घडलेल्या ( Leopard Attack) हृदयद्रावक घटनेत १३ वर्षीय रोहन विलास बोंबे याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात रोहनचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यातील हा तिसरा बळी ठरला असून, संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी फोडून पेटवून दिली तसेच बेस कॅम्पचे कार्यालय जाळले. यावेळी ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली की, ठोस उपाययोजना जाहीर होईपर्यंत शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.
रविवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास रोहन घराबाहेर खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. बराच वेळ मुलगा दिसत नसल्याने पालक आणि शेजाऱ्यांनी शोध घेतला. तरुणांनी आरडाओरड करत शेतात शोध घेतला असता, रोहनचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण ( Leopard Attack) निर्माण झाले.
यापूर्वी १२ ऑक्टोबर रोजी शिवण्या बोंबे आणि २२ ऑक्टोबर रोजी भागुबाई जाधव यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग तीन घटनांनंतर ग्रामस्थांचा रोष उफाळून आला. “दोन वेळा रास्तारोको करूनही प्रशासनाला जाग आली नाही. अजून किती बळी गेल्यानंतर उपाययोजना होतील? यापुढे मतदान बहिष्कार टाकू,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
घटनेनंतर पंचतळे (बेल्हा-जेजुरी महामार्ग) आणि रोडेवाडी फाटा (अष्टविनायक महामार्ग) येथे दीड ते दोन हजार ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ( Leopard Attack) आला आहे.


















