Team MyPuneCity – मुळशी तालुक्यातील कासारसाई येथील सर्वे नं. १९/१ मधील जमिनीच्या हक्कावरून दोन गटांमध्ये वाद उफाळून शिवीगाळ, धमकी, मारहाण, बंदुकीचा धाक, आणि दगडफेकीपर्यंत प्रकरण गेले. विशेष म्हणजे याच घटनेवरून दोन्ही बाजूंनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शेतकरी शब्बीर मुलाणी यांची तक्रार
शब्बीर करीमभाई मुलाणी (वय ६३, रा. कासारसाई, मुळशी) हे दि. ६ जून २०२५ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांच्या घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्यांचे शेजारील मिळकतीतील (सर्वे नं. १९/१) काही लोक प्लॉट तयार करत असल्याचे दिसून आले. यावर त्यांनी “ही जमीन आमची आहे, इथे तुम्ही काय करताय?” असा जाब विचारला.
या वादातून संतप्त होऊन अॅड. संदीप भोईर यांनी बंदूक दाखवून धमकी दिल्याचा आरोप मुलाणी यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत ३–४ अनोळखी इसम होते. या सर्वांनी मुलाणी आणि त्यांच्या मुलीस शिवीगाळ व दमदाटी केली, असा गंभीर आरोप त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि पांचाळ करत आहेत.
वकील संदीप भोईर यांची दुसरी बाजू
या घटनेनंतर संदीप हिरामण भोईर (वय ४८, रा. डांगे चौक, बेरगाव, पुणे) यांनीही शब्बीर मुलाणी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर जमिनीबाबत ‘जैसे थे स्थिती’ ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला धुडकावून मुलाणी यांनी त्यांच्या १६ एकर जागेतील कंपाउंड भिंत तोडली आणि ट्रॅक्टरने नांगरणी सुरू केली.
या कृतीवर आक्षेप घेत संदीप भोईर हे घटनास्थळी पोहोचून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा राग धरून शब्बीर मुलाणी व त्यांच्या ४–५ साथीदारांनी भोईर यांच्यावर लाकडी दांडके व कुऱ्हाडीने हल्ला केला. तसेच दगडफेक, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी देखील हिंजवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि पांचाळ करत आहेत.
दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून भूखंडाच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या या वादाला कायदेशीर आणि गुन्हेगारी स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन्ही तक्रारींचा परस्परसंबंध लक्षात घेता पोलिसांकडून तटस्थ तपास सुरू आहे. जमीन वादाशी संबंधित या घटनेंत न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीचा मुद्दाही गुंतल्याने, संपूर्ण प्रकरणात कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुढील तपासासाठी संबंधित न्यायालयीन कागदपत्रांची पडताळणी आणि दोन्ही बाजूंनी साक्षींची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.