Team MyPuneCity –आज सकाळी ७ च्या सुमारास सासवड वरुन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी कडे मार्गस्थ झाला. सकाळचा विसावा बोरवके मळा , दुपारचा विसावा यमाई देवी शिवरी येथे झाला.
यावेळी शिवरी येथील विविध मान्यवर, ग्रामस्थ भाविकांच्या वतीने माऊलींच्या पालखीचे जोरदार स्वागत केले.माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेण्यात आल्या.येथे अभिषेक ,महापूजा , महानैवेद्य आदी विधी संपन्न झाले. तदनंतर पालखी सोहळ्याने साकुर्डे येथे अल्प विसावा केला.व जेजुरी कडे पालखी सोहळा मार्गस्थ होऊन सायंकाळी पाचच्या सुमारास पोहचला.
आज सासवड-जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. कपाळी गोपीचंदाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळशीचे वृंदावन, टाळ-चिपळ्या मृदंगाच्या साथीने, मुखातून होत असलेला विठूनामाचा गजर असे चित्र वारीच्या वाटेवर दिसून आले. जेजुरीचा मल्हारगड नजरेच्या टप्प्यात येताच येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट असा होत होता.
माऊलींचा पालखी रथ जेजुरी दाखल झाल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर जेजुरीतील भाविक भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केली. पिवळ्या भंडाऱ्यान माऊलींचा रथ न्हाहून निघाला.’ येळकोट येळकोट, जय मल्हार’ आणि ‘माऊली माऊली’ असा गजर करत जेजुरी नगरीमध्ये पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी श्रींचा रथावर आकर्षक अशी फुल सजावट करण्यात आली होती.

पुरंदर विधानसभेचे आमदार तथा मा. जलसंधारण राज्य मंत्री विजयबाप्पू शिवतारे यांनी माऊलींच्या रथाच्या विद्युतीकरणासाठी 5kV क्षमतेचे किर्लोस्कर मेक जनरेटर माऊली चरणी अर्पण केले.