आरटीआय कार्यकर्त्याकडून (Highmast Scam) चौकशीची मागणी
Team MyPuneCity – थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकॅडमीच्या मैदानावर केवळ क्रिकेट सराव होतो, सामने खेळवले जात नाहीत. मात्र, या मैदानावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाने तब्बल साडे आठ कोटी रुपये खर्चून हायमास्ट (Highmast Scam) व एलईडी दिव्यांची उभारणी केली, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी केला आहे.
या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, त्यांनी तत्कालीन सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले व विद्यमान सह शहर अभियंता संजय खाबडे यांच्यावर तातडीने कारवाई (Highmast Scam) करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर मैदान हे दिलीप वेंगसरकर अकॅडमीने महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतले असून, येथे राज्यस्तर, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत नाहीत, फक्त प्रशिक्षण दिले जाते. तरीही येथे मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकल्प राबवला गेला आहे.
या प्रकल्पात फक्त एका हायमास्ट खांबाच्या स्ट्रक्चर साठी तब्बल १२ लाख रुपये खर्च दाखवण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप वाघेरे यांनी केला आहे. चार खांबांसाठी एकूण ४८ लाख रुपये केवळ स्ट्रक्चरल कामासाठी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी खुद्द दिलीप वेंगसरकर यांनी या मैदानाला भेट दिली असता, निकृष्ट दर्जाचे लाइट्स व उभारलेले खांब (Highmast Scam) पाहून ते अवाक् झाले, असेही वाघेरे यांनी सांगितले. त्यांनी वानखेडे स्टेडियमवर केवळ ६ कोटी रुपयांमध्ये अधिक दर्जेदार प्रकाशयोजना उभारली गेली, याचे उदाहरणही दिले.
वेंगसरकर अकॅडमीने हा खर्च करणे अपेक्षित असताना, महापालिकेच्या निधीतून ही उधळपट्टी (Highmast Scam)करण्यात आली, असा आरोप करत वाघेरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, गलबले व खाबडे यांची पगार व मालमत्ता जप्त करून सार्वजनिक पैशांची वसुली करावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.
या संदर्भात त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनाची प्रत पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच राज्य माहिती आयुक्त कार्यालयाकडे देखील पाठवण्यात आली आहे.