Team MyPuneCity – शहरात आज शनिवार (६ जून) रोजी सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली असून, काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे मोठी कोंडी निर्माण झाली आहे. देहूरोड–कात्रज बाह्यवळण रस्त्यावर व वाकड येथील इंदिरा कॉलेजसमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, या ठिकाणी रस्त्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना नदी ओलांडल्याचा अनुभव आला.
दरम्यान, हवामान विभागाने आज (६ जून) आणि उद्या (७ जून) साठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा (Heavy Rains) इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तुरळक ठिकाणी वीज कोसळण्यासह वादळ, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.
Khed Murder : चुलत्याचा खून, चुलतभावावर प्राणघातक हल्ला : पुतण्यास अटक
या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, जलजमाव झालेल्या भागांतून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, काही भागांत झाडे कोसळल्याचे प्रकारही समोर आले आहेत. नागरिकांनी शक्यतो घरात राहावे, घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, विजेच्या खांबांपासून व झाडांपासून दूर रहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहरातील वाकड, थेरगाव, चिखली, पिंपळे सौदागर, आकुर्डी, निगडी आणि भोसरी या भागांत पावसाचे विशेष प्रमाण (Heavy Rains) नोंदवण्यात आले आहे. अनेक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी यांना पावसामुळे वेळेवर पोहोचण्यात अडचणी आल्या.
महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.