Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे बंधूंच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शस्त्र परवाना (Gun Licenses) मिळवताना त्यांनी पुण्यातील खोटे पत्ते दाखवून पोलिसांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी शशांक हगवणे याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात तर सुशील हगवणे याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हगवणे कुटुंब पुणे ग्रामीणमधील पौड परिसरात वास्तव्यास आहे. 2022 साली त्यांनी बंदुकीसाठी (Gun Licenses) पुणे ग्रामीण पोलीसांकडे परवाना अर्ज केला होता. मात्र, संबंधित पोलिसांनी तो अर्ज फेटाळला. त्यानंतर दोघांनीही पुणे शहरात राहत असल्याचे दाखवून बनावट पत्ते सादर केले आणि भाडेकरार दाखवून शस्त्र परवाना मिळवला.
शशांकने वारजे तर सुशीलने कोथरुड परिसरातील पत्ता पोलिसांकडे सादर केला होता. त्यानंतर दोघांनाही पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून शस्त्र परवाने (Gun Licenses) मिळाले. सुशील हगवणेचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात तो पिस्तुल कंबरेला खोवून नाचताना दिसतो. दुसरीकडे, शशांक हगवणे याच्यावर काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक प्रशांत एळवंडे यांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान, निलेश चव्हाण नावाच्या फरार आरोपीने देखील याच कालावधीत खोट्या माहितीद्वारे शस्त्र परवाना मिळवल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील कागदपत्रांची कसून चौकशी सुरू केली असून, खोट्या माहितीच्या आधारे परवाने मिळवण्याच्या प्रकारामुळे हगवणे बंधूंना आता कायदेशीर अडचणींचा आणखी सामना करावा लागणार आहे.