Team My Pune City – स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत ( Ganja trafficking) असलेल्या एका कॉन्स्टेबलचा थेट गांजाबाजाराशी संबंध असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एका मादक पदार्थ प्रकरणाच्या तपासादरम्यान ही बाब समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून शहर गुन्हे शाखेने याबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे.
शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने थेऊर येथील 25 वर्षीय बेरोजगार युवक पवार याला सापळा रचून अटक केली. या कारवाईत आरोपीकडून तब्बल 7 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणातील पुढील तपासासाठी पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्याची सखोल तपासणी केली.
या तपासात आरोपी पवारचा नियमित संपर्क स्वारगेट पोलिस ( Ganja trafficking) ठाण्यातील एका कॉन्स्टेबलशी होत असल्याचे स्पष्ट झाले. या निष्कर्षांवरून संबंधित कॉन्स्टेबलची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. याबाबत माहिती देताना झोन-2 चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिटे म्हणाले, “आरोपीचा मोबाईल तपासताना कॉन्स्टेबलसोबत त्याचा सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित कॉन्स्टेबलविरोधात स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.”
या धक्कादायक प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा धुळीस ( Ganja trafficking) मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला गुन्हे शाखा मादक पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवत असताना, दुसरीकडे पोलिस यंत्रणेतच काही घटकांचा गुन्हेगारीशी संबंध येणे ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबलचा गांजाबाजाराशी नेमका काय संबंध आहे, तो थेट व्यवहारात गुंतलेला होता की आरोपीला अन्य प्रकारे मदत करीत होता, याबाबत तपास यंत्रणा सर्व बाजूंनी ( Ganja trafficking) चौकशी करत आहे.