Team MyPuneCity – सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४’ बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार हेमंत रासने, शंकर जगताप, श्रीमंती दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजक विलास कामठे, बापूसाहेब धमाले, कैलास भांबुर्डेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
गणेशोत्सव (Ganesh Festival) सर्वांना एकत्र करणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव जगातील पावणेदोनशे देशात साजरा केला जातो. जगामध्ये गेलेले भारतीय गणेशोत्सव साजरे करत असतात. नवी पिढीदेखील या उत्सवात मनापासून काम करत असते. आपली भारतीय संस्कृती, परंपरा, सण हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. सर्वांमध्ये आपलेपणा, एकोपा निर्माण करणारे आहेत. त्यातून अनेकांना सामाजिक क्षेत्रात संधी मिळत असते, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
पवार पुढे म्हणाले, गणेश मंडळे वर्षाचे ३६५ दिवस काम करत असतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जागृतीचा सुंदर सेतू निर्माण करण्याचे काम करतात, ही अभिमानाची बाब आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे समाजसेवेचे शक्तीकेंद्र ठरले आहे. गणेशोत्सवात कोणीही मागे राहू नये यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा.

गणेशोत्सव (Ganesh Festival) हा राज्य उत्सव व्हावा यासाठी आमदार रासने यांनी विधानसभेत भूमिका मांडली. आणि मुख्यमंत्री तसेच आपल्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सर्व सभागृहाने पाठिंबा दिला, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
आपली भूमी साधू, संतांची, वारकऱ्यांची असून कोणतेही गालबोट न लागता उत्सवा साजरा केला जावा. हे करत असताना सामाजिक भान देखील ठेवले पाहिजे. निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आगामी गणेशोत्सव सामाजिक सलोखा राखून, पर्यावरण पूरक साजरा करावा. पर्यावरण संरक्षणासाठी गणेश विसर्जन कृत्रिम हौदात केले जावे, अशी भूमिकादेखील त्यांनी मांडली.
राज्य शासन पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील शहरे आणि राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवत आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आणि पीएमआरडीएचा रिंग रोड, मेट्रोची कामे करण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. विकास कामे करत असताना जमिनीची आवश्यकता लागते. पुणे, पिंपरी चिंचवडच्या भविष्याचा विचार करता त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
Black Magic : तळेगाव दाभाडे येथे जादूटोणा केल्याचा प्रकार उघड
राज्यात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी वेगवेगळ्या ठिकाणी औद्योगिक गुंतवणूक यावी यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र उद्योजकांचा जास्तीत जास्त कल पुणे परिसरात येण्याकडे असतो. त्यामुळे त्यांना सुविधा देणे गरजेचे असते. विकास करत असताना ज्यांच्या जमिनी जातील त्यांची पर्यायी व्यवस्थाही केली जाईल. कोणाची गैरसोय होणार नाही, असेही ते म्हणाले.
गणेशोत्सव (Ganesh Festival) कालावधीत मेट्रो सेवा रात्री उशीरापर्यंत व पहाटे लवकर सुरू व्हावी ही मागणी पाहता तथा सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार रासने प्रास्ताविकात म्हणाले, १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. समाज संघटित करण्याचे कार्य या उत्सवातून होत आहे. पिंपरी चिंचवड येथे गेली ४० वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन होत आहे. यावर्षी सुमारे २६० मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यापैकी ९६ मंडळे बक्षिसासाठी पात्र ठरली. गणेशोत्सव हा राज्य उत्सव व्हावा या विधानमंडळात मांडलेल्या भूमिकेला यश आले. गणेश मंडळांमार्फत वर्षभर समाजोपयोगी काम होत असते. हा उत्सव निर्बंधमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न व्हावेत. उत्सवादरम्यान कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
Pune Real estate : पुणे ठरले देशातील सर्वाधिक घरे विक्री होणारे आणि किफायतशीर शहर
आमदार जगताप म्हणाले, समाजाची एकरुपता गणेशोत्सवातून (Ganesh Festival) दिसून येते. सर्व जाती, धर्म, पंथातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवून समाजात एकोपा रहावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
या स्पर्धेत प्रथम आलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळ थेरगाव, द्वितीय बक्षीस प्राप्त कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ भोसरी, तृतीय क्रमांकाचे बक्षीस चिंतामणी मित्र मंडळ वाल्हेकरवाडी चिंचवडगाव, चतुर्थ क्रमांक भैरवनाथ मित्र मंडळ आकुर्डी, पाचवे बक्षीस भैरवनाथ मित्र मंडळ पिंपळे गुरव काशिदवाडी यांच्यासह अ, ब, क, ड विभागासाठीची बक्षिसे, शालेय विभाग आणि सजावट विभागातील बक्षिसे वितरीत करण्यात आली.
यावेळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या परीक्षकांचाही सन्मान करण्यात आला.