Team MyPuneCity – निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि प्राण्यांचे रक्षण यासाठी झटणाऱ्या ‘फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन’चा २६ वा वर्धापन दिन आणि रौप्यमहोत्सवी समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. यावेळी ‘रेस्क्यू’ या प्राण्यांचे बचाव कार्य करणाऱ्या संस्थेचे संचालक किरण रहाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

किरण रहाळकर यांनी उपस्थितांसमोर वाघ, बिबटे, पक्षी, देवमासा यांच्यासारख्या दुर्मीळ प्राण्यांचे जीव वाचवताना आलेले थरारक अनुभव फोटो आणि व्हिडीओद्वारे मांडले. त्यांचे अनुभव ऐकताना उपस्थितांनी एक अनोखी जगण्याची लढाई प्रत्यक्ष अनुभवल्यासारखे वाटले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल भगत यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे यांनी कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
Pune: पुण्यात भारतीय प्राणी संशोधन संस्थेच्या हॅकाथॉन स्पर्धेत नवकल्पनांचा झंझावात; 110 तासांच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. ‘रेस्क्यू’ संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नेहा पंचमीया, महासीर मॅन शशांक ओगले, एव्हरेस्टवीर राजेश पठाडे, बांबू तज्ञ हेमंत बेडेकर, उत्तम नगरसेवक निखिल भगत, अनाथ बालकांसाठी कार्य करणारे ‘संपर्क बालग्राम’चे प्रमुख अमितकुमार बॅनर्जी, माजी वृक्ष अधिकारी सिद्धेश्वर महाजन, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे रामभाऊ परुळेकर विद्यामंदिर, उत्कृष्ट नर्सरी मालक नरेंद्र फुलसुंगे आणि दुर्मीळ वनस्पतींचे संकलक अजित गोखले यांना गौरवण्यात आले.
संस्थेच्या गेल्या २५ वर्षांत योगदान दिलेल्या सर्व माजी अध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या वर्धापन दिनानिमित्त २४ व २५ मे रोजी इनडोअर व आऊटडोअर शोभिवंत झाडांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले, ज्याला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासाठी डायमंड नर्सरी (सोमाटणे) आणि प्लॅन्ट पॅराडाईज नर्सरी (परवंदवडी) यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव सुधाकर मोरे, खजिनदार श्री सावंत, विश्वास देशपांडे, संजय साखळे, प्रकाश पंडित, ज्योती गोखले, अमित पोतदार, सुपर्णा गायकवाड, तनया महाजन, पूजा डोळस, मीरा रामायणे, विवेक रामायणे आणि फोना टीमने अथक मेहनत घेतली.