Team My Pune City –गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावरून (Eknath Shinde)भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर एकामागोमाग एक आरोप करणारे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक वक्तव्य केले. कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये. मी रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते शनिवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांविषयी विचारले असता. एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्याकडून रवींद्र धंगेकरांना निरोप गेला आहे. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केलं होतं, आजही करतो आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल, असे कृत्य वक्तव्य करु नये, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणी मोहोळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड
रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांच्याकडे पक्षाचा काय तो निरोप जायचा होता तो गेला आहे. धंगेकरांचं वक्तव्य जे आहे, त्याबाबत मी त्यांच्याशी बोलेन. ते मला भेटतीलही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मोदींना संत तुकारामांची मूर्ती भेट म्हणून दिली. पंतप्रधान मोदी यांच्याशी राज्यात सुरू असलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाबाबत मोदीजींनी आस्थेने चौकशी केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोदीजींनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.




















