Team My Pune City – एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा ( Eknath Shinde Dasara Melava) आज गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला, विरोधकांवर टीका केली आणि विशेषतः पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असा ठाम शब्द दिला.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शब्द ( Eknath Shinde Dasara Melava)
गोरेगाव नेस्को एग्झिबिशन सेंटर येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून केली. “मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. बळीराजाचं दु:ख मी स्वतः बांधावर जाऊन पाहिलं आहे. पूरग्रस्ताची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका ( Eknath Shinde Dasara Melava)
शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. “कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी घेऊन दौऱ्याला जाणारा हा एकनाथ शिंदे नाही. फेसबुक लाईव्ह करणारा हा शिंदे नाही. आम्ही दोन्ही हाताने दिलं, कधी म्हटलं नाही माझ्या हातात काही नाही. बाळासाहेबांचे विचार हीच माझी खरी संपत्ती आहे,” असे ते म्हणाले. तसेच, “३० वर्षांची माया कुठे गेली, लंडनला का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोपही केला.
Talegaon Dabhade News : तळेगावात आदर्श महिला शिक्षकांचा सन्मान
मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक ( Eknath Shinde Dasara Melava)
आपल्या भाषणात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “पहलगाममध्ये आपल्या बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम पाकडयांनी केलं, त्यांना धडा शिकवण्याचं काम मोदींनी केले. खून का बदला खून, गोली का जवाब गोली से दिला,” असे ते म्हणाले. २६/११ च्या हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आणि मोदी दबावाला बळी पडत नाहीत, असे स्पष्ट केले.
मुंबई महाराष्ट्राचीच राहील ( Eknath Shinde Dasara Melava)
शिंदे यांनी मुंबईच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली. “मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही माय का लाल तोडू शकणार नाही. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहील. निवडणुका आल्या की मराठी माणसाचं नाव घेणाऱ्यांवर आता कोणी विश्वास ठेवणार नाही,” असे ते म्हणाले. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंवर आणखी टोले ( Eknath Shinde Dasara Melava)
शिंदे यांनी ठाकरेंवर आणखी टोले लगावत म्हटले की, “जे सोडून गेले ते लोकं का जात आहेत, त्याचं आत्मपरीक्षण करणार की नाही? जगात असा कोणी अध्यक्ष नसेल जो स्वत:च्याच लोकांना संपवतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची सावली तरी सोबत राहील का?”
वैद्यकीय मदत कक्ष व मुस्लिम बांधवांची उपस्थिती ( Eknath Shinde Dasara Melava)
मेळाव्याच्या ठिकाणी शिवसेनेतर्फे वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला होता. येथे आलेल्या शिवसैनिकांची बीपी, शुगर तपासणी करून औषधे देण्यात आली. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवरही उपचार उपलब्ध होते. विशेष म्हणजे, या मेळाव्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मानखुर्द परिसरातून शेकडो मुस्लिम बांधव मेळाव्याला आले होते.
शिवसैनिकांचा आत्मविश्वास ( Eknath Shinde Dasara Melava)
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन, उद्धव ठाकरेंवर केलेले पलटवार, मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक आणि मुंबई महाराष्ट्राचीच राहील या ठाम भूमिकेमुळे मेळावा गाजला. वैद्यकीय मदत कक्ष, मुस्लिम बांधवांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे मेळाव्याला विशेष रंगत आली.