Team MyPuneCity – देहू-आळंदी रस्त्यावरील डूडूळगाव परिसरात मंगळवारी (२१ मे) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यांवर अक्षरशः पूरसदृश परिस्थिती (Dudulgaon Water Logging) निर्माण झाली.
आळंदीजवळील डूडूळगाव रस्त्यावरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. या पाण्यामुळे दुचाकीस्वारांना वाहने चालवणे कठीण झाले असून अनेकजण दुचाकी ढकलत पुढे जाताना दिसले. आई हॉस्पिटलजवळील तळेकर चौक रस्त्यावर दरवर्षी साचणाऱ्या पाण्यामुळे (Dudulgaon Water Logging) नागरिक हैराण झाले असून यंदा पावसाळा सुरु होण्याच्या आधीच परिस्थिती बिकट झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
या भागातील स्थानिक नागरिक जनार्दन सोनवणे यांनी “अवकाळी पावसात अशी अवस्था झाली आहे, तर खऱ्या पावसाळ्यात काय परिस्थिती असेल?” असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षीच पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचते आणि नागरिकांना तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
या समस्येकडे पिंपरी चिंचवड महापालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे व लवकरात लवकर नाली व्यवस्था दुरुस्त करून पाणी साचण्याचा प्रश्न (Dudulgaon Water Logging) कायमचा सोडवावा, अशी मागणी सोनवणे व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या पावसामुळे झालेल्या परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून अनेक नागरिकांनी महापालिकेच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे.