Team MyPuneCity – शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने दिघी येथील एका वृद्ध व्यक्तीची एक कोटी नऊ लाख ४७ हजार ४०० रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अहमदाबाद गुजरात येथून अटक केली.
भौमिक भरतभाई पटेल (२९, अहमदाबाद, गुजरात), आकाश पोपटभाई रादडीया (२४, अहमदाबाद गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Talegaon Dabhade : अतुलनीय उंची गाठत कृष्णराव भेगडे शाळेतील दहावीच्या मुलांनी केले यश संपादन
दिघी येथील जेष्ठ नागरीकास फेसबुकवरुन अनोळखी इसमाने ऑनलाईन ट्रेडींग संर्दभात लिंक पाठवली. त्याद्वारे व्हॉटसअप ग्रुपमध्ये ऍड केले. त्यानंतर त्यांना त्यांचे ब्लॉक ट्रेड व आयपीओ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅप्लिकेशन व प्लॅटफॉर्मद्वारे शेअर मार्केटींग, स्टॉक मार्केटींगमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे अमीष दाखवले. फिर्यादी व्यक्तीचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. केलेल्या गुंतवणुकीवर मोठा नफा झाल्याचे खोटे इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करून दाखविण्यात येत होते. काही कालावधीनंतर फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना ब्रोकरेज फि, हाय ट्रान्झेक्शन फि, सिक्युरिटी डीपॉझिट, थर्ड पार्टी हाय ट्रान्ॲक्शन विड्रोअल प्लॅटफार्म असे वेगवेगळे चार्जेस सांगून त्यांच्याकडून एकूण एक कोटी नऊ लाख ४७ हजार ४०० रुपये घेत फसवणूक केली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरात दहावीच्या परीक्षेत मुली ठरल्या अव्वल; शहराचा दहावीचा निकाल ९७.९७ टक्के
आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी काढली. एक बँक खाते अहमदबाद गुजरात येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी तात्काळ अहमदाबाद येथे जाऊन दोन्ही आरोपींना अटक केली. त्या आरोपींनी त्यांचा साथीदार दिलीप याच्यासोबत संगनमत करुन फसवणुकीची रक्कम बँक अकाऊंटवर घेऊन ती आंगडीया मार्फत पुढे पाठवल्याचे सांगितले. आरोपींचा साथीदार हा नेपाळ येथे राहून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. नेपाळ येथून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीसोबत आरोपींचे संबंध असल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपींनी फसवणुकीची रक्कम घेण्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकडे, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, दीपक माने, अभिजित उकिरडे, दीपक भोसले, नितेश बिच्चेवार, स्वप्नील खणसे, महेश मोटकर, प्रीतम भालेराव, निलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, परशुराम चव्हाण, पंकज धोटे, संतोष सपकाळ, मोनिका चित्तेवार, शुभांगी ढोबळे, दीपाली चव्हाण यांनी केली.