Team MyPuneCity –जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू तसेच संपूर्ण वारकरी संप्रदाय, फडकरी, दिंडीकरी समाज आणि संतांच्या भक्तांनी कीर्तनकार वसंत गडकर (बाळकृष्ण जनार्दन गायकवाड) यांनी तुकोबारायांच्या गाथेविषयी आणि त्यांचा सदेह वैकुंठगमन या विषयावर केलेल्या अपशब्द व विधाने याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर विश्वनाथ मोरे (इनामदार) यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे, ह.भ.प. वैभव अशोक मोरे, ह.भ.प. दिलीप नारायण मोरे, ह.भ.प. गणेश उत्तम मोरे आणि ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे यांच्या सह्यांनी हा जाहीर निषेध प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Dehu Road: देहूरोडमध्ये विजेच्या धक्क्याने पाच शेळ्यांचा मृत्यू
निषेधपत्रात म्हटले आहे की, “अर्धवट बुद्धीच्या काही कथित कीर्तनकारांनी संत तुकाराम महाराज यांच्यावर अक्षेपार्ह विधाने करून, त्यांच्या चरित्राचा अपमान केला आहे. अशा संतांचा अपमान करणाऱ्या व संतसाहित्य समजून न घेता टीका करणाऱ्या कीर्तनकारांना समाज कधीही माफ करणार नाही.”
तसेच या वक्तव्यात संतांच्या अभंगांच्या ओळी उद्धृत करून संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन सत्य असल्याचा पुनःप्रत्यय दिला आहे –
“प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माजी अद्भुत वर्तले। मानवदेह घेऊनिया निजधामा गेले।”
“देव भावाचा भुकेला, तुका वैकुंठाशी नेला।”
संस्थेच्या आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, “अशा पोटासाठी सोंग घेणाऱ्या आणि संतांच्या नावाचा बाजार करणाऱ्या कीर्तनकारांना समाजातून वाळीत टाकून त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.”
हा निषेध केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून, संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आत्माभिमान असून, संतांची बदनामी करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संस्थानने दिला आहे.