Team MyPuneCity –’ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर सशस्त्र दलातील जवानांचे आभार व्यक्त करण्यासाठी मंगळवारी (ता.२०) सायंकाळी चार वाजता भर पावसात देहू ते वडगाव मावळ अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा प्रारंभ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाद्वारात नारळ फोडून 14 टाळकरी कमानी पासून करण्यात आला.
या यात्रेचा प्रारंभ सी. आर. पी. एफ चे आय.पी.एस. ब्रिगेडियर वैभव निंबाळकर, माजी सैनिक शिवाजी विघ्ने माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, नगरसेवक योगेश काळोखे ज्योती टिळेकर, नितीन मराठे, रवींद्र भेगडे गणेश भेगडे, बापू महाराज भंडारी पांडुरंग महाराज शितोळे यांनी तिरंगा यात्रेला शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुवीर शेलार यांनी केले.

तिरंगा यात्रेमध्ये पुढे भारत मातेची प्रतिमा व ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रतिकृती ट्रॅक्टर वर लावण्यात आली होती.
रॅली सायंकाळी चार वाजता निघण्याच्या तयारीत असतानाच देहूत वळवाच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे रॅलीमध्ये सहभागी झालेल्या तरुणांची व कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. मात्र देशभक्ती आणि देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी या रॅलीत सहभागी झालेले तरुण पाऊस पडत असताना देखील भिजत रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅली दरम्यान देशभक्तीपर गीते ध्वनि क्षेपकावर वाजवण्यात येत होती. रॅली सहभागी झालेल्या प्रत्येक वाहनांवर तिरंगा लावण्यात आलेला होता. रॅलीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक तरुणांमधील उत्साह उसांडून वाहत होता हे सर्व तरुण पावसात भिजत असतानाही भारत माता की जय अशा घोषणा देत होते.

मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही सहभागी तरुणांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह तूसभरही कमी झालेला नव्हता. ही रॅली 14 टाळकरी कमान, देहूतील प्रवेशद्वार कमान मार्गे परंडवाल चौकातून पालखी मार्गाने झेंडे मळा, चिंचोली, देहूरोड या मार्गे वडगाव मावळ कडे मार्गस्थ झाली. या रॅलीमध्ये देहू देहू रोड भाजपा मंडळ प्रमुख रघुवीर शेलार तळेगाव दाभाडे चे मंडल प्रमुख चिराग खांडगे, बाळासाहेब शेलार, दत्तात्रय माळी, अभिमन्यू शिंदे, विलास शिंदे, नारायण पचपिंड, रवींद्र काळोखे, संतोष हगवणे आदी मान्यवर सहभागी झाले होते.