Team MyPuneCity – चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात शुक्रवारी रात्री एक अजब प्रकार समोर आला. येथे एका झाडाच्या बुंध्यापासून अचानक पाणी वाहू लागले आणि काही क्षणांतच या दृश्याने सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने प्रसिद्धी मिळवली. कुणी याला “झाड रडतंय” (Crying Tree) म्हणालं, तर कुणी “अमृतधारा”, तर काहींनी थेट “देवच झाडातून अवतरलेत” असा श्रद्धेचा टोकाचा दावा केला.
घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणावर नागरिक झाडाभोवती जमले. अनेकांनी झाडाला हार घातले, हळद-कुंकू लावलं, काहींनी त्या पाण्याने तोंड, डोळे धुतले. काहींनी “हे पाणी लावल्याने डोकं शांत राहतं” असं सांगत भावनिक श्रद्धा व्यक्त केली. परिसरात गुलाल उधळला गेला, रांगोळ्या काढल्या गेल्या आणि सेल्फी काढण्यासाठी रांगही लागली.
अग्निशमन व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप (Crying Tree)
काही सुजाण नागरिकांनी या प्रकाराबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाडाच्या बुंध्यापासून पाणी (Crying Tree) येत असल्याचं पाहिलं, पण त्यांना तो ‘दैवी चमत्कार’ वाटला नाही – तर पाण्याची ‘गळती’ असल्याचा संशय आला.
Heavy Rains : पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; रस्ते जलमय, मंदावला वाहतुकीचा वेग
त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन परिसराचा पाणीपुरवठा थांबवला. क्षणात झाडाचे ‘अश्रू’ थांबले (Crying Tree) आणि ‘चमत्काराचे’ रहस्य उलगडले.
झाड नव्हे, तर पाईप गळती!
खरेतर काही वर्षांपूर्वी या परिसरात भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यावर उगम पावलेल्या झाडाच्या आतून किड्यांनी पोखरलेले लाकूड आणि त्यातून पाईप फुटल्याने, पाण्याला झाडाच्या बुंध्यापासून वाहण्यासाठी वाट मिळाली. परिणामी, झाडातून पाणी वाहण्याचा (Crying Tree) प्रकार निर्माण झाला होता.
ज्येष्ठ नागरिकाचा खोचक सल्ला
या सगळ्या प्रकारावर एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, “श्रद्धा ठेवायला हरकत नाही, पण झाडातून पाणी (Crying Tree) आलं की आधी पाईप तपासा. देवदर्शन होईल की नाही माहित नाही, पण पाणीगळती नक्की सापडेल!”
प्रेमलोक पार्कमधील ही ‘झाडलीकेज’ घटना आपल्याला दाखवून देते की, श्रद्धेचा ओव्हरफ्लो कधी-कधी वास्तवाचा गळतीमुळे होतो. चमत्कार बघण्याची उत्सुकता ठेवायलाच हवी, पण त्या मागे ‘पाइप’ असेल, याचीही शक्यता लक्षात घ्यायला विसरू नये.