Team MyPuneCity – रात्रीच्या वेळी महिला घरात एकटी असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने महिलेच्या घराचे दार जोरजोरात वाजवले. घाबरलेली महिला तिच्या माहेरी गेली. त्यानंतर शेजाऱ्याने घरात जाऊन घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली. दुसऱ्या दिवशी महिला घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शेजारी राहणाऱ्या महिलेने तिच्या पतीने चोरी केल्याचे कबूल केले. मात्र चोरी केलेले सर्व दागिने आणि रोख रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे.
याबाबत माहिती अशी कि, गणेशनगर बोपखेल येथे तक्रारदार महिलेचा बंगला आहे. २२ जून रोजी रात्री महिला घरात एकटीच होती. रात्रीच्या वेळी शेजारी राहणाऱ्या आकाश पटेल याने महिलेच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवला. मध्यरात्री दरवाजा वाजत असल्याने महिला घाबरली. घाबरलेल्या महिलेने माहेरच्या लोकांना फोन करून बोलावून घेतले. माहेरच्या लोकांनी येऊन महिलेला माहेरी नेले.
दुसऱ्या दिवशी महिला कामासाठी गेली. २३ जून रोजी सायंकाळी महिला घरी आली असता तिच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. महिलेने घरातील दागिने आणि रोख रकमेची पाहणी केली असता घरातून ५० हजार रुपये रोख रक्कम, कानातले, अंगठ्या, मंगळसूत्र, आयफोन असे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. महिलेने घरासमोर लावलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये एक व्यक्ती तक्रारदार महिलेचा दरवाजा वाजवत असून त्यानेच घरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
काही वेळाने आकाश पटेल याची पत्नी तक्रारदार यांच्या घरी आली. तिच्या पतीने चोरी केली असून चोरी केलेले अर्धे दागिने घेऊन आम्हाला माफ करा, असे म्हणू लागली. तक्रारदार महिलेने पोलिसांना बोलावून घेतले. आकाश पटेल याच्या पत्नीने पोलिसांच्या समक्ष चोरलेले अर्धे दागिने परत केले. उर्वरित दागिने आणि रोख रक्कमेबाबत चौकशी केली असता ते तिचा पती आकाश याच्याकडे असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी आकाश याला संपर्क केला असता त्याने पोलिसांची फिरकी घेत आता देतो, नंतर देतो असे म्हणून टाळाटाळ केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आकाश पटेल विरोधात कारवाई करण्याची मागणी तक्रारदार महिलेने दिघी पोलिसांकडे केली आहे.