जय मल्हार हॉटेल परिसरात तिघांचा दुकानदारावर हल्ला; दोघांना अटक
Team MyPuneCity – केवळ पाणीपुरी दिली नाही म्हणून संतापलेल्या तिघांनी मिळून एका फेरीवाल्या दुकानदारास बेदम मारहाण केल्याची घटना उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
फिर्यादी हे ३३ वर्षीय इसम असून, जय मल्हार हॉटेलजवळ पाणीपुरीचा व्यवसाय करतात. २२ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपी करणसिंग गचंड (वय २०, रा. वडगाव बुद्रुक), दर्शन पवार (वय २४, रा. वडगाव बुद्रुक) व त्यांच्या एका साथीदाराने दुकानात येऊन पाणीपुरी मागितली. त्या वेळी काही कारणास्तव पाणीपुरी न मिळाल्याने त्यांनी रागाच्या भरात फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादीला दुखापत झाली असून, घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.