Team MyPuneCity – पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी भाजप कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्यावर वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट भूमिका घेत, “कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, चुकीचे वागल्यास कायद्यानुसार कारवाई होणारच,” असे ठाम विधान केले.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याचे चित्रीकरण करत दमदाटी केल्याचा आरोप ओंकार कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आहे. या प्रकारानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कदम व त्यांच्या सहकाऱ्यांना महापालिकेच्या मुख्यालयात व संबंधित कार्यालयांमध्ये प्रवेशबंदीचे आदेश जारी केले आहेत.
Lohgad Landslide : लोहगड किल्ल्याजवळ भाजे येथे दरड कोसळली; जीवितहानी नाही
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी संबंधित प्रकरणावर विचारले असता, त्यांनी म्हटले, “मी स्पष्ट सांगतो – कुणीही असेल, आमच्या पक्षाचा असो वा इतर कोणत्याही पक्षाचा, जर त्याने चुकीचे वागणे केले असेल, कायदा मोडला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारांमध्ये आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही.”
फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या प्रतिक्रियेमुळे संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाईची शक्यता वाढली असून पक्षीय पातळीवरही याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली असून प्रशासनाकडून तात्काळ कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.