Team My Pune City – संवाद, संपर्काची साधने कमी असतानाच्या काळापासून पोस्ट खात्याने अतुलनीय सेवा बजावली असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याचे समाजमनाशी भावनिक नाते जडले आहे. आजच्या आधुनिक काळात माणुसकी, कृतज्ञतेचे महत्त्व कमी होत चाललेले असताना सामान्य माणसाचा जपलेला विश्वास हे शंभर वर्षातील संचित आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.
पुण्यातील सिटी पोस्ट येथील सेवेला शंभर वर्षे होत असल्याचे तसेच जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून बुधवार पेठ येथील साईनाथ मंडळ ट्रस्ट, भवानी पेठ येथील श्री शिवाजी मित्र मंडळ, फडके हौद येथील विधायक मित्र मंडळ, गुरुवार पेठ येथील वीर शिवाजी मित्र मंडळ यांच्यावतीने आज (दि. 9) पोस्टमन तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान प्रा. मिलिंज जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
PCU : समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता सिद्ध करा – डॉ. प्रसाद प्रधान
त्या वेळी ते बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, वरिष्ठ पोस्ट मास्तर विलास घुले, वरिष्ठ अधीक्षक (पश्चिम विभाग) नितीन येवला यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टमनच्या पोशाखात असलेल्या मीरा पियुष शहा हिने कर्मचाऱ्यांचे औक्षण केले. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांच्या संकल्पनेतून आणि प्रल्हाद थोरात, अभिषेक मारणे, शिरीष मोहिते, किरण सोनीवाल यांनी सिटी पोस्ट ऑफिस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोस्टमन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या सोहळ्याविषयी कौतुक व्यक्त करून प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, काळानुरूप बदल स्वीकारल्याने पोस्ट विभाग आज टिकून आहे. कामाप्रती सचोटी आणि प्रामाणिकपणा हे पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, कर्मचाऱ्यांनी सेवेला श्रद्धेची जोड दिल्याने पोस्ट विभागाची उपयुक्तता आजही टिकून आहे. गणेशोत्सवाने काळानुरूप बदल स्वीकारले त्याच प्रमाणे पोस्ट विभागानेही आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याने त्याचा निश्चितच उपयोग झाला आहे. आनंद सराफ म्हणाले, पोस्ट कर्मचारी हा जिव्हाळ्याच्या नात्यांमधील दुवा आहे.
जागतिक टपाल दिन व भारतीय टपाल दिवस आज खऱ्या अर्थाने साजरा झाला, अशी भावना विलास घुले यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची संकल्पना मांडताना पियुष शहा म्हणाले, समाजातील अखेरच्या घटकापर्यंत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत प्रल्हाद थोरात, अभिषेक मारणे , किरण सोनीवाल यांनी केले. अमर लांडे यांनी पोस्टाच्या आवारात सुंदर रांगोळी रेखाटली होती तर जितेंद्र भुरुक यांनी ‘डाकिया डाक लाया’ हे गीत सादर केले. शाह यांनी आभार मानले.