Team MyPuneCity – आदर्श मुख्याध्यापक स्वर्गीय नटराज जगताप यांच्या जन्मदिनानिमित्त लोकजागर ॲक्टिव्हिटिज या चळवळीच्या माध्यमातून व खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाचे माजी विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते बालाजी मोरे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय नटराज जगताप विद्यार्थी विकास केंद्र स्थापन केले असून त्या अंतर्गत वीरपत्नी दुर्गाबाई चापेकर संस्कारवर्ग आणि अभ्यासिकेचे उद्घाटन शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी वेताळनगर, चिंचवडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदस्य प्रकाश मीठभाकरे यांच्या हस्ते व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, जेजुरी खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अनिल सौंदडे, प्रा. डॉ. हेमंत देवकुळे, केंद्र शाखाप्रमुख राजेश आरसूळ, सेवा वस्ती प्रमुख मिलिंद पांडे, दिनेश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी हलगीचा कडकडाट, पायात चाळ, खांद्यावर आसूड अन् कंबरेला आब्रान अशा पोतराजाच्या वेषात, देवीच्या पारंपरिक ओव्यांच्या चालीवर स्वरचित गीते गात शाहीर आसराम कसबे, शिवाजी पोळ, हृषीकेश गायकवाड, ज्ञानेश्वर पोळ, विष्णू तोरड या लोककलावंतांनी परिसरातील चिमुकले विद्यार्थी, पालक, नागरिक यांच्याशी सुसंवाद साधून शिक्षण आणि स्वच्छता या विषयावर सादर केलेल्या पथनाट्यास मोठ्या संख्येनी उपस्थित असलेल्या महिला पालक व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Medha Patkar: भीमनगरच्या रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन न्याय द्यावा ;ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांची मागणी

प्रकाश मीठभाकरे, डॉ. अशोक नगरकर, प्रा. दिगंबर ढोकले आणि अनिल सौंदडे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना या शैक्षणिक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे नमूद करून स्वर्गीय नटराज जगताप यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ कार्य पुढे अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प केला.

याबाबत अधिक माहिती देताना शाहीर आसराम कसबे म्हणाले की, ‘ध्येय आणि दिशा देणारे आदर्श मुख्याध्यापक नटराज जगताप यांचे अल्पशा आजाराने अकस्मित निधन झाले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य निरंतर चालू राहावे या उद्देशाने लोकजागर ॲक्टिव्हिटिज या चळवळीच्या माध्यमातून वस्ती तेथे संस्कारवर्ग आणि अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी सुसंस्कार वर्ग सुरू करणे, शिववंदना, बुद्धवंदना, लहुवंदना आणि चापेकरस्तवन याद्वारे समाजभक्ती अन् देशभक्ती जागृत करणे, इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देणे, प्रत्येक महिन्याला विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये ध्येयनिष्ठा निर्माण करणे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा शोध घेऊन त्या विकसित करणे आणि रोजंदारीमुळे ज्या पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्या पालक, विद्यार्थी आणि शाळा यामध्ये समन्वय साधणे, अशी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.