Team MyPuneCity –अगोदर एका विदेशी व्यक्तीचा मोबाईल फोन तिघांनी चोरी केला. त्यानंतर त्यातील दोघांनी दोन दिवसानंतर चिखली मधील दोन अल्पवयीन मुलींना वाशीम येथे पळवून नेले. मोबाईल चोरी करणारा तिसरा साथीदार चोरीचा मोबाईल विक्रीसाठी फिरत असताना चिखली पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर हे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिगंबर सुनील साळुंके (२०, जाधववाडी, चिखली), विशाल राजू कांबळे (१९, सुसगाव), विशाल प्रभाकर समुखराव (१९, लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पार्क सुंग हो (४५, बालेवाडी, पुणे. मूळ रा. रिपब्लिक ऑफ कोरिया) हे १७ मी रोजी तुकाई माता मंदिराजवळ फिरत असताना तीन अज्ञात आरोपींनी त्यांचा ७२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत असताना माहिती मिळाली कि जाधववाडी येथील रिव्हर रेसिडेन्सी जवळ एक तरुण चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दिगंबर साळुंके याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ७२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, १५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन आणि ५० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे. आरोपीला बाणेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
PCMC: पिंपरी चिंचवडकरांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पाहण्याची संधी
दरम्यान, चिखली मधून १९ मे या एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या गुन्ह्यांचा तपास देखील चिखली पोलीस करीत होते. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दिगंबर याच्याकडे चौकशी केली असता त्याचे साथीदार विशाल कांबळे आणि विशाल समुखराव यांनी चिखली येथील दोन मुलींना पळवून नेल्याची माहिती दिली. चिखली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून विशाल कांबळे आणि विशाल समुखराव या दोघांना वाशीम येथून अटक केली.