Team MyPuneCity –मध्यप्रदेशातील दोघांमधील कौटुंबिक वाद आणि पत्नीवरील संशयातून चाकणमध्ये बंटी सिंह परमार या इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात रामबाबू जाटव या आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे दोन पथक आरोपीचा शोध घेत आहेत.
मयत बंटी सिंह परमार (रा. मध्यप्रदेश) हा चाकण परिसरात राहत होता. तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बंटी सिंह परमार याचे आरोपी रामबाबू जाटव (रा. मध्यप्रदेश) यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. या संशयातूनच १४ मे २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास बंटी सिंह परमार झोपेत असताना आरोपीने लाकडी फळीसारख्या वस्तूने त्याच्या तोंडावर वार करून गंभीर जखमी केले.
जखमी अवस्थेत बंटी सिंह याला प्रथम चाकण येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने १७ मे रोजी त्याला ससून हॉस्पिटल, पुणे येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १९ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.
सदर घटना प्रथम अपघाती मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली होती. मात्र, मृत्यूच्या तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी व इतर साक्षीदारांच्या जबाबांवरून हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चाकण पोलीस स्टेशन येथे रामबाबू जाटव याच्याविरोधात भा.दं.वि.च्या कलम १०३(१), २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dehu Road: देहूरोडमध्ये विजेच्या धक्क्याने पाच शेळ्यांचा मृत्यू
गुन्ह्याचा पुढील तपास चाकण पोलीस स्टेशनकडून सुरू असून, आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.