Team My Pune City –चाकण मध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात आणि राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे मार्गी लावावीत या मागणीसाठी सर्वपक्षीय नागरिक, ट्रॅफिक मुक्त चाकण कृतिसमिती व चाकण एमआयडीसी मधील उद्योगांचे प्रतिनिधी , डॉक्टर असोसिएशनचे सदस्य, व्यापारी, कामगार, यांनी बुधवारी ( दि. १६) चाकण मध्ये आंदोलन व निदर्शने केली. पुणे नाशिक महामार्गावर चाकण मधील तळेगाव चौकात हातात फलक घेतलेले शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते.
खोट्या बाता खोटा विकास चाकणच्या वाट्याला रस्ता भकास, आपण आपल्या घरातल्या मृत्यूची वाट पाहत आहे का, ट्रॅफिक मुक्त चाकण होणार कधी? अशा आशयाचे फलक घेऊन रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर दणाणून सोडला.
Rotary Club : समाजातील वंचित घटकांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा -भगवान शिंदे
Alandi : पालिकेच्या सूचना फलकासमोरच कचरा

‘दररोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या रस्त्यांवरून प्रवास करतात. अपुऱ्या देखरेखीतून अपघात होत असून कोणी जबाबदारी घेत नाही. केवळ मोठ्या टेंडर काढून सरकार जबाबदारी झटकत आहे, ही लोकांच्या जिवाशी थट्टा असल्याचा आरोप आंदोलनस्थळी असलेल्या पदाधिकारी व नागरिकांनी केला. चाकण मधील महामार्गांची कामे घोषणांच्या पुढे सरकत नाहीत. मागील २५ ते ३० वर्षात रस्त्याच्या कामांच्या अनेकदा घोषणा झाल्या प्रत्यक्षात रस्त्यांची कामे झालीच नाहीत. पुणे-नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यांची कामे कोट्यावधी रुपयांच्या कामांची घोषणा होऊन लालफितीत अडकून पडली आहेत. याच विरोधात बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. चाकण एमआयडीसी मध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी देखील आपापल्या कंपन्यांच्या समोर आंदोलने करत या मध्ये सहभाग नोंदवला. चाकण मध्ये आंदोलन स्थळी चाकण पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर लोकप्रतिनिधींचे आंदोलन :
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, अपघातांचे वाढते प्रमाण आणि सामान्य जनतेला भोगावे लागणारे हाल यावर खेडचे आमदार बाबाजी काळे , मावळचे आमदार सुनील शेळके , शिरूरचे आमदार माउली कटके यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाम भूमिका घेत निदर्शने केली. शासन या तिघा आमदारांच्या ठाम भूमिकेला गांभीर्याने घेऊन पुढील किती जलदगतीने कृती करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.