Team MyPuneCity -दरवाजे तोडून घरात शिरलेल्या चार दरोडेखोरांनी दाम्पत्याला मारहाण करत व धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सुमारे ४ लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. दरोडा घालून पळून जाताना दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल काढून घेतले, तसेच घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. सकाळी बाहेरील वाटसरू लोकांनी बाहेरून कडी उघडल्यानंतर सदरची घटना शनिवारी (दि. १४ ) सकाळी उघडकीस आली.
सुरेश चिमाजी टोपे ( वय 55, सध्या रा. निगडी, मूळ रा. गारगोट शिवार , वाकी बु. ता. खेड ) यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार दरोडेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.13 जून ) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वाकी बुद्रुक गावाच्या हद्दीत शेतामधील टोपे यांच्या घराचे सेफ्टी डोअर व लोखंडी दरवाजाचे लॉक तोडून घरात शिरलेल्या चौघांनी दांपत्याला ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण करत , धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील तब्बल ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला पळून जाताना चोरट्यांनी या दांपत्याचे मोबाईल फोन काढून घेतले व त्यांच्या बेडरूमला बाहेरून कडी लावून निघून गेले.
याप्रकरणी सुरेश टोपे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अंदाजे 35 ते 40 वयोगटातील चार अज्ञात दरोडेखोरांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये दीड तोळे वजनाची सोन्याची चैन, पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र, अर्धा तोळा वजनाचे कर्णफुले, अर्धा तोळा वजनाची हाताच्या बोटातील अंगठी असा तीन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.

दरम्यान कोंडलेल्या दांपत्याने शनिवारी सकाळी घराच्या बेडरूम मधून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना आवाज दिला. त्यानंतर बेडरूमच्या दरवाजा उघडण्यात आला. या दांपत्याने परिसरात पाहणी केली असता घराच्या पाठीमागील बाजूस काही अंतरावर सकाळी त्यांचे मोबाईल फोन चोरट्यांनी परिसरात फेकलेले निदर्शनास आले. सर्व दरोडेखोर मराठीमधून एकमेकांशी संवाद साधत होते.
या दरोडेखोरांना आवाज आणि शरीराच्या ठेवणीवरून ओळखता येईल असे या दाम्पत्याने पोलिसांना सांगितले आहे. घटनास्थळी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट दिली असून याबाबतचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.