भोसरीतील वैष्णोमाता, इंद्रायणीनगर शाळेत यशस्वी डिजिटल मतदान प्रक्रिया संपन्न
Team My Pune City –पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी (Bhosari)येथील वैष्णोमाता, इंद्रायणीनगर शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी एक अभिनव आणि यशस्वी डिजिटल मतदान प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.
निवडणूक प्रक्रियेत संदीप वाघमोरे यांनी विकसित केलेल्या डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. हे डिजिटल तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक, पेपरलेस मतदान राबवण्यात आले.
Lonavala Crime News : जमीन खरेदी फसवणुक प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल, अजिवली येथील प्रकार
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच राबवली. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि देशातील निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली जाते, (Bhosari)याची विद्यार्थ्यांना माहिती व्हाव, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये निवडणूक अर्ज भरण्यापासून, मतपत्रिका तयार करणे, विद्यार्थ्यांना विविध चिन्हांचे वाटप करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे, अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. विद्यार्थ्यांनी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी अशा विविध महत्त्वपूर्ण भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडल्या. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि त्याचे बारकावे प्रत्यक्ष अनुभवता येत आहेत.
३०० विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

या निवडणुकीत पाचवी ते सातवीतील ३७९ मतदारांपैकी ३०० विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वैभव कोपरे आणि नाजियाखातून अन्सारी या विद्यार्थ्यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. मतदान प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे निकालही लगेच जाहीर झाला. यामध्ये शुभम दयानंद आवटे १४६ मतांनी विजयी होऊन शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवडून आला. यांच्यासह एकूण १० उमेदवार निवडून आले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सजग नागरिकत्व आणि लोकशाही मूल्यांची दृढ रुजवात होण्यास मदत झाली आहे.
शाळेतील ही निवडणूक हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रिया शिकवणारी एक जिवंत प्रयोगशाळा आहे. अशा उपक्रमांमधून उद्याचे सजग, जबाबदार आणि सशक्त नागरिक घडतील. पिंपरी चिंचवड महापालिकेला असे अभिनव उपक्रम सातत्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवत असते.
— शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
भोसरीतील वैष्णोमाता शाळेने विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात राबवलेली डिजिटल निवडणूक ही निश्चितच कौतुकास्पद आहे. ही निवडणूक केवळ एका शालेय प्रक्रियेपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती विद्यार्थ्यांसाठी लोकशाही शिक्षणाचा एक जिवंत अनुभव ठरणार आहे. मतदार यादी, प्रचार, मतदान आणि निकाल जाहीर होईपर्यंत सर्व टप्पे विद्यार्थ्यांनी स्वतः पार पाडले, हे विशेष उल्लेखनीय आहे. अशा उपक्रमांमधून मुलांना संविधानाची ओळख, मताधिकाराचे महत्त्व आणि जबाबदारीने निर्णय घेण्याची शिकवण मिळते.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न रुजवता, त्यांना व्यवहारात लोकशाही प्रक्रियेचा थेट अनुभव देणे, ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डिजिटल आणि पर्यावरणपूरक निवडणूक राबवून लोकशाही मूल्यांच पालन केले आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थी सजग नागरिकत्व, जबाबदारी, पारदर्शकता आणि निर्णयक्षमतेसारख्या मूलभूत गोष्टी आत्मसात करतात. ही केवळ शालेय निवडणूक नसून, भविष्यातील सुजाण मतदार आणि जबाबदार नागरिक घडवण्याची दिशा आहे.
- किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त,पिंपरी चिंचवड महापालिका