Team My Pune City –महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale)यांचे सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज समाधी सोहळ्या निमित्त आळंदीत आगमन झाले होते.यावेळी त्यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.देवस्थान च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज समाधी सोहळ्या निमित्त हरी नाम गजरात लाखो भाविकांची प्रदक्षिणा रोड वर दिंडी निघाली होती. इंदिरा एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावटकरण्यात आली होती.
तसेच दि.१७ रोजी भरत गोगावले यांना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी मंत्री) पद मिळाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा) यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष (आळंदी नगरपालिका) व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या हस्ते भव्य सत्कार समारंभ संस्थेच्या शेठ कांतिलाल नंदराम चोरडिया सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न झाला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संजय घुंडरे, खेड तालुक्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी भोईर साहेब, शिवसेना आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण, लक्ष्मण गोगावले, सुहास महाराज गोगावले, शिवसेना शेतकरी संघटनेचे सुनील कोंढाळकर, आदर्श गाव वरंध ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंत पोकळे, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, सदस्य अनिल वडगावकर, बाबुलाल घुंडरे, शिव व्याख्याते आकाश भोंडवे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री महोदयचे सनई, ढोल ताशांच्या सुमधुर वाद्यासह लेझीम पथक तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात दमदार स्वागत करण्यात आले.
Pune : व्यवसायवाढीसाठी ‘ब्राह्मण बिझनेस काँक्लेव्ह कमिटी’तर्फे उपक्रम; व्यवसायाची वाटचाल : छोट्या पावलांपासून मोठ्या यशाकडे
Pimpaloli Crime News : पिंपळोली येथे रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगावकर यांनी मंत्री महोदय जेव्हा आमदार झाल्यानंतर शाळेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते त्यावेळेस सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे सर्व शिक्षक – विद्यार्थी यांनी भरत गोगावलेना मंत्री मंडळामध्ये पद मिळावे अशी माऊली चरणी प्रार्थना केली होती. त्याची फलश्रुती भरत गोगावलेना मंत्रीपद मिळाले याचा आनंद व्यक्त केला.
त्यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचा समारंभ आयोजित केल्याचे सांगितले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीमध्ये आषाढी व कार्तिकी यात्रेमध्ये माऊली भक्तांना संपूर्ण शाळा इमारत व परिसर राहण्यासाठी दिला जातो. तेव्हा अरुंद कमान व असलेला कच्चा रस्ता यामुळे त्यांना व वाहनांना अडचण निर्माण होते. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांनाही अडचण तयार होते. त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेला विद्यालयाच्या कमान व रस्त्याचे काम करून मिळावे अशी मागणी केली. तदनंतर चैतन्य महाराज लोंढे यांनी भरत गोगावले हे कॅबिनेट मंत्री जरी असले तरी ते आमच्यातील एक सदस्य आहेत याचा जास्त आनंद आहे. तसेच त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडत करत समाजसेवेचे व्रत घेतले आणि या समाजसेवेची फलश्रुती म्हणजे आज त्यांना कॅबिनेट मंत्रीपद प्राप्त झाले ही माऊलीची कृपा असल्याचे सांगितले.
शेवटी भरत गोगावले हे बोलताना म्हणाले की वारकऱ्यांच्या भक्ती करिता जसे ईश्वराचे मंदिर पवित्र तसे शालेय विद्यार्थ्यांना ज्ञान व संस्कार मिळण्याचे ज्ञानमंदिर म्हणजे शाळा. त्यामुळे शाळेला सर्वांनी करावी. शाळेतून आदर्श व्यक्तिमत्व घडतात म्हणून शाळेविषयी सर्वांनी आदर ठेवावा असे सांगितले. तसेच आयुष्यात कितीही मोठे झालो तरी देव, देश आणि धर्म त्याचबरोबर आई-वडील, गुरु व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नये असा मोलाचा संदेश दिला. संतांच्या त्याग व विचारामुळे आज हे जग चालत आहे. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आचार व विचारांवर चालण्याची गरज असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता साधली तर माणूस कधीच अपयशी होऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी सतत प्रयत्न करत राहण्यासाठी प्रेरणा दिली. स्वतःच्या जीवनातील खडतर / प्रतिकूल परिस्थिती ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास थोडक्यात व्यक्त केला. तो सर्वांना प्रेरणादायी ठरेल . अजित वडगावकर यांनी स्व: साठी काही न मागता शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व माऊली भक्तासाठी केलेली मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी मानले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर मंत्री विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षक शिक्षकदारांमध्ये रमले व त्यांच्याशी संवाद साधला.