मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
समस्यांचे जलदगतीने निराकरणासाठी नोडल अधिकारी नेमण्याची सूचना
Team MyPuneCity – हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता; ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल; याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या. तसेच, पावसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना पाटील यांनी यावेळी दिली.
कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ यांच्या सह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या सह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती पाटील (Chandrakant Patil) यांना दिली. यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून; त्यापैकी १५ नाले हे कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर नामदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. तसेच,मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावी. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांची पाहणी २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या.
यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना कामांसाठी मुख्यालयात जावे लागते, त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला गेला. त्यावर नामदार पाटील यांनीही हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी केली. दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा खंडित होणे, झाडांच्या फांद्या वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.